एक्स्प्रेसच्या धडकेत 7 हत्तींचा मृत्यू

आसाममध्ये ‘राजधानी’च्या इंजिनसह पाच डबे घसरले : सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

आसामच्या होजई जिह्यात हत्तींचा एक कळप शनिवारी सकाळी सैरंग-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला धडकला. या अपघातात सात हत्तींचा मृत्यू झाला असून हत्तीचे एक पिल्लू जखमी झाले आहे. या धडकेनंतर ट्रेनचे इंजिन आणि पाच डबे रुळावरून घसरल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. चांगजुराई गावाजवळ पहाटे 2:17 वाजता हा अपघात झाला. सुरुवातीला आठ हत्तींचा मृत्यू झाल्याचे वृत्त होते, परंतु नंतर एक पिल्लू हत्ती जिवंत असल्याचे आणि गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. अपघातामुळे अप्पर आसाम आणि ईशान्येकडील रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती.

रेल्वे अपघातात पाच डबे आणि ट्रेनचे इंजिन रुळावरून घसरल्याचे ईशान्य सीमा रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले. प्रवासी झोपेत असताना ट्रेनमधील प्रवाशांना अचानक धक्का जाणवताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. परिसरातील दाट धुक्यामुळे अपघात झाल्याचा संशय आहे. एक्स्प्रेस थेट हत्तीच्या कळपाला धडकल्यानंतर सात हत्तींना प्राण गमवावे लागले. मृत हत्तींचे पोस्टमॉर्टेम केले जात असल्याचे नागाव विभागीय वन अधिकारी सुहास कदम यांनी सांगितले. तसेच स्थानिक पशुवैद्य जखमी झालेल्या हत्तीच्या पिल्लावर उपचार करत आहेत.

आपत्कालीन ब्रेक लावल्यानंतरही धडक

गुवाहाटीपासून सुमारे 126 किलोमीटर अंतरावर असलेल्या लुमडिंग विभागाच्या जमुनामुख-कानपूर विभागात हा अपघात झाल्याचे ईशान्य सीमा रेल्वेचे (एनएफआर) मुख्य जनसंपर्क अधिकारी कपिन्जल किशोर शर्मा यांनी सांगितले. हत्तींचा एक कळप अचानक ट्रेनसमोर आला. लोको पायलटने आपत्कालीन ब्रेक लावले, परंतु तरीही, हत्ती ट्रेनला धडकल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सैरंग-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस मिझोरममधील सैरंग (ऐझॉलजवळ) येथून दिल्लीतील आनंद विहार टर्मिनलपर्यंत धावते. अपघातानंतर, रुळावरून घसरलेल्या डब्यांमधील प्रवाशांना तात्पुरते इतर रेल्वेंमधील रिकाम्या बर्थवर हलवण्यात आले. त्यानंतर बाधित डबे काढून टाकण्यात आले आणि उर्वरित ट्रेन चार तासांनंतर सकाळी 6:11 वाजता गुवाहाटीसाठी रवाना झाली. गुवाहाटीमध्ये ट्रेनमध्ये अतिरिक्त डबे जोडून प्रवाशांना पुन्हा बसवल्यानंतर ट्रेनने आपला पुढील प्रवास सुरू केला.

या रेल्वे अपघातानंतर बाधित भागातून जाणाऱ्या गाड्या अप लाईनवर वळवण्यात आल्या. घटनास्थळी रेल्वे ट्रॅक दुरुस्त करण्याचे काम दुपारपर्यंत सुरू होते. एनएफआरचे महाव्यवस्थापक आणि लुमडिंग विभागीय रेल्वे व्यवस्थापक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते.

Comments are closed.