उत्तराखंडमध्ये बोगदा दुर्घटनेत 7 कामगारांचा मृत्यू; 14 जखमी – TMarathiNews
चमोली: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील मायापूर (पिपलकोटी) येथे THDC जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामाधीन बोगद्यात गुरुवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात मलबा आणि पाणी शिरल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 7 कामगारांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. बोगद्यात अडकलेल्या 22 कामगारांपैकी 21 जणांचा शोध लागला असून, एक कामगार अद्याप बोगद्यात अडकलेला आहे.
ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी सुमारे 6.45 वाजता घडली. HCC कंपनीकडून जलविद्युत प्रकल्पासाठी बोगद्याचे बांधकाम सुरू होते. कामगारांची शिफ्ट सुरू असताना अचानक मोठ्या प्रमाणात मलबा आणि पाणी बोगद्यात घुसल्याने अनेक कामगार आत अडकले.
बचावासाठी SDRF, NDRFसह अनेक पथके तैनात
दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), लष्कर, ITBP, स्थानिक पोलिसांसह विविध यंत्रणांची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.
बोगद्यात शिरलेले पाणी बाहेर काढणे आणि मलबा हटवण्यासाठी यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येत आहे. पाणी आणि मलब्यामुळे अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी SDRFच्या जवानांकडून तात्पुरत्या ड्रम-बोटींचाही वापर केला जात आहे. अडकलेल्या शेवटच्या कामगाराला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
14 जखमींवर रुग्णालयात उपचार
दुर्घटनेत जखमी झालेल्या 14 कामगारांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना आवश्यकतेनुसार मोठ्या वैद्यकीय केंद्रांमध्ये हलवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. इतर जखमींवर गोपेश्वर येथे उपचार सुरू आहेत.
चमोलीचे जिल्हाधिकारी गौरव कुमार यांनी सांगितले की, THDCच्या जलविद्युत प्रकल्पासाठी हा बोगदा बांधण्यात येत होता. सायंकाळी साडेसहा ते पावणेसातच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणात मलबा आणि पाणी बोगद्यात शिरले. त्यानंतर कामगार अडकले आणि NDRF, SDRF तसेच उपलब्ध यंत्रसामग्रीच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
मुख्यमंत्री धामी घटनास्थळी दाखल
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शुक्रवारी खराब हवामानाचा सामना करत पिपलकोटी येथे पोहोचून बचावकार्याची पाहणी केली. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे लँडिंग अत्यंत कठीण झाले होते.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री धामी प्रशासन, पोलिस, SDRF, NDRF आणि इतर बचाव यंत्रणांकडून बचावकार्याचा आढावा घेणार आहेत. तसेच बोगद्यात अडकलेल्या कामगाराला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आवश्यक निर्देश देणार आहेत. धामी यांनी बचावलेल्या जखमी कामगारांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीचीही विचारपूस केली.
“बोगद्यात अडकलेल्या प्रत्येक कामगाराला सुरक्षित बाहेर काढणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सर्व यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत,” असे मुख्यमंत्री धामी यांनी सांगितले.
दुर्घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट
बचावकार्य सुरू असले तरी बोगद्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मलबा आणि पाणी नेमके कशामुळे शिरले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशासनाकडून दुर्घटनेच्या कारणांचा तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्हा Incident Response Force (DIRF), स्थानिक पोलिस आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) यांच्यासह विविध यंत्रणांचे जवान घटनास्थळी बचावकार्य करत आहेत. अडकलेल्या कामगाराला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने उपलब्ध सर्व यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ घटनास्थळी तैनात केले आहे.
Comments are closed.