नवी मुंबईत 76 हजार दुबार मतदार, ऐरोली, बेलापूर विधानसभेतील यादीत ‘सेम टू सेम’ नावे, मतदार याद्यांवर दरोडा कोणाचा?

नवी मुंबईच्या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये मोठा घपला करण्यात आला असून सुमारे ७६ हजार नावे दुबार नोंदवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ही नावे ऐरोली आणि बेलापूर विधानसभेच्या याद्यांमध्ये सेम टू सेम आहेत. ऐरोली विधानसभा क्षेत्रात दुबार मतदारांची संख्या ४१ हजार तर बेलापूर विधानसभा क्षेत्रात ३५ हजार इतकी आहे. यामुळे कोणाच्या आशीर्वादाने या मतदार याद्यांवर दरोडा टाकण्यात आला आहे याची चौकशी करा अशी मागणी केली जात आहे.

सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करून नवी मुंबईतील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ केला आहे. प्रत्येक प्रभागात निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या भावी उमेदवारांना बोगस नावे घुसवण्याचे टार्गेट दिले होते. त्यामुळे नवी मुंबईत दुबार मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जी नावे ऐरोली मतदारसंघात आहेत, तीच नावे बेलापूर मतदारसंघात दिसत आहेत. एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागातही टाकण्यात आली आहेत. त्यामुळे मतदार याद्या फुगीर झाल्या आहेत. ऐरोली विधानसभा क्षेत्रात ४१ हजार ५५६ दुबार मतदारांची संख्या आहे. बेलापूरमध्ये ही संख्या ३५ हजार आहे. दोन्ही मतदारसंघात सर्वच याद्यांची कसून तपासणी केली तर दुबार मतदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळी ऐरोलीत मतदान, दुपारी बेलापूरमध्ये हक्क

नवी मुंबईतील दुबार मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यामुळे दुबार नावे असलेल्या मतदारांना सहज बोगस मतदान करता येणार आहे. सकाळी ऐरोलीत मतदान केलेला मतदार दुपारी बेलापूरमध्ये मतदानाला जाऊ शकणार आहे. निवडणूक आयोगाने या बोगस मतदानासाठी अप्रत्यक्षरीत्या वाव दिल्याने विरोधी पक्षातील इच्छकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नावे तातडीने वगळा

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रारूप प्रभागरचना जाहीर केली आहे. त्यामुळे निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीपूर्वी मतदार यादीतील दुबार नावे तातडीने वगळण्यात यावीत, अशी मागणी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते संतोष शेट्टी, अनवर हवलदार, विद्याताई भांडेकर, उत्तम पिसाळ, प्रल्हाद गायकवाड, संतोष सुतार, बाबासाहेब गायकवाड, शांताराम शेट्टी आदी उपस्थित होते.

Comments are closed.