रेल्वे कर्मचार्यांसाठी 78 दिवसांचा बोनस
10.91 लाख कर्मचाऱ्यांना लाभ : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा दिवाळी बोनस मंजूर करण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 1,866 कोटी रुपयांच्या उत्पादकता-आधारित बोनसला (पीएलबी) मंजुरी दिल्यामुळे 10.91 लाख कर्मचाऱ्यांना त्यांचा फायदा होईल. तसेच सुमारे 70,000 कोटी रुपयांच्या नवीन जहाजबांधणी सुधारणा सादर करण्यात आल्या. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या 10 लाख 91 हजार 146 कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस 78 दिवसांच्या पगाराच्या समतुल्य असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. दरवर्षी, दुर्गा पूजा/दसऱ्याच्या सुट्टीपूर्वी पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना पीएलबी दिले जाते. गेल्यावर्षी मोदी सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 2,029 कोटींचा बोनस मंजूर केल्यामुळे 11 लाख 72 हजार 240 कर्मचाऱ्यांना फायदा झाला होता.
पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांसाठी देय असलेली कमाल रक्कम 17,951 रुपये आहे. ही रक्कम विविध प्रकारच्या रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली जाणार असून त्यात ट्रॅक मेंटेनर, लोकोमोटिव्ह पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्टर, सुपरवायझर, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ मदतनीस, पॉइंटमेन, आणि इतर गट ‘क’ कर्मचारी यांचा समावेश आहे. रेल्वेने 2024-25 मध्ये असाधारण कामगिरी केल्याचे सरकारने म्हटले आहे. रेल्वेने विक्रमी 1614.90 दशलक्ष टन मालवाहतूक केली आणि अंदाजे 7.3 अब्ज प्रवाशांची वाहतूक केल्याची माहितीही याप्रसंगी देण्यात आली.
जहाजबांधणीलाही गती देण्याचा निर्णय
भारताच्या जहाजबांधणी आणि सागरी क्षेत्राचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मंत्रिमंडळाने 69,725 कोटी रुपयांच्या सुधारणा पॅकेजला मंजुरी दिली आहे. ज्यामध्ये जहाजबांधणी, सागरी निधी आणि देशांतर्गत क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणारा व्यापक दृष्टिकोन समाविष्ट असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
104 किमीचे रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण
मंत्रिमंडळाच्या बैठकीत बख्तियारपूर-राजगीर-तिलाइया दरम्यान एकाच रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला मान्यता देण्यात आली. बिहारमधील सुमारे 104 किमी लांबीच्या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला गती मिळणार असून त्यासाठी 2,192 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. बिहार राज्यातील चार जिह्यांना व्यापणारा हा प्रकल्प भारतीय रेल्वेच्या विद्यमान जाळ्याचा अंदाजे 104 किलोमीटरने विस्तार करेल. या प्रकल्पाचा भाग राजगीर (शांती स्तूप), नालंदा, पावपुरी इत्यादी प्रमुख स्थळांना रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रदान करत असल्यामुळे देशभरातील यात्रेकरू आणि पर्यटक आकर्षित होतील, असा दावा करण्यात आला.
बिहारमध्ये महामार्ग चौपदरीकरण
बिहारमधील ‘राष्ट्रीय महामार्ग-139डब्ल्यू’च्या साहिबगंज-अरेराज-बेतिया विभागाच्या हायब्रिड अॅन्युइटी मोडवर चौपदरी बांधकामाला मान्यता दिली आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 78.942 किलोमीटर असून त्यासाठी 3,822.31 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रस्तावित चौपदरी प्रकल्पाचे उद्दिष्ट राज्याची राजधानी पटना आणि बेतिया दरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारणे हे आहे. या माध्यमातून उत्तर बिहारमधील वैशाली, सारण, सिवान, गोपाळगंज, मुझफ्फरपूर, पूर्व चंपारण आणि पश्चिम चंपारण जिह्यांना भारत-नेपाळ सीमेवरील भागांशी जोडले
Comments are closed.