इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे आठ जणांचा मृत्यू.

पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मैला मिसळल्याने घटना

वृत्तसंस्था / इंदूर (मध्यप्रदेश)

पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये ड्रेनेजचे मैलामिश्रित पाणी मिसळले गेल्याने मध्यप्रदेश राज्याच्या इंदूर शहरात मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 8 नागरीकांचा मृत्यू झाला असून 116 जण आजारी पडले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या घटनेच्या चौकशीचा आदेश देण्यात आला असून दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

आतापर्यंत मध्यप्रदेशच्या आरोग्य विभागाने 4 जणांच्या मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. तथापि, सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. इंदूर शहराचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी ही माहिती दिली. महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी शहराच्या प्रत्येक प्रभागात पोहचले असून त्यांनी तेथील पिण्याच्या पाण्याची तपासणी केली आहे. ही दुर्घटना कशी घडली, याची चौकशी केली जाणार असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कठोर कारवाई होईल. कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन पुष्यमित्र भार्गव यांनी केले.

मुख्यमंत्र्यांकडून गंभीर नोंद

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेची गंभीर नोंद घेतली असून त्वरीत चौकशीचा आदेश दिला आहे. त्यांनी तातडीचा उपाय म्हणून दोन नागरी अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच एका उपअभियंत्याला कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. राज्य प्रशासन या घटनेचा गांभीर्याने विचार करीत आहे. सखोल चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. चौकशी अहवाल त्वरित देण्याचा आदेश देण्यात आला आहे. ही घटना शहराच्या भगीरथपुरा भागात घडली असून कठोर कारवाई निश्चित होईल, असे आश्वासन मोहन यादव यांनी दिले आहे.

त्रिसदस्यीय समिती नेमली

या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने तीन सदस्यांच्या समितीची स्थापना त्वरित केली आहे. सनदी अधिकारी नवजीवन पन्वर हे या समितीच्या अध्यक्षस्थानी असतील. पर्यवेक्षक अभियंता प्रदीप निगम आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे सहप्राध्यापक डॉ. शैलेश राय हे या समितीचे आणखी दोन सदस्य असतील. समितीला एक महिन्याच्या आत अहवाला देण्याचा आदेश आहे.

विनामूल्य उपचार होणार

दूषित पाणी प्यायल्याने आजारी असलेल्या लोकांवर सरकारच्या खर्चाने उपचार केले जात आहेत. तसेच प्रत्येक मृतामागे 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान घोषित करण्यात आले आहे. आजारी नागरीकांवर योग्य उपचार होतील अशी हमी देण्यात आली असून मुख्यमंत्री यादव स्वत: या कामावर लक्ष ठेवून आहेत सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भात कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही. पुन्हा असे प्रकार घडू नयेत, याची दक्षता भविष्यकाळात घेण्यात येईल. नागरी प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री यादव यांनी केले.

सर्व शक्यता गृहित धरणार

या दुर्घटनेचे अन्वेषण सर्व शक्यता गृहित धरुन केले जाणार आहे. यात घातपाताच्या शक्यतेचाही समावेश आहे. तसेच शहरातील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईची सुरक्षा वाढविण्यात येत आहे. ड्रेनेज पाईपलाईन्सची नियमित तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बुधवारीं सकाळपासून सोडलेल्या पिण्याच्या पाण्याचे नमुने संकलित करण्यात आले असून त्यांचे परीक्षण केले जात आहे. आजारी असलेल्यांना बरे करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. त्यांच्यावर सर्वाधिक उत्तम उपचार करण्यात येत असून काही जणांना प्राथमिक उपचारांच्या नंतर घरी जाऊ देण्यात आले. हे पाणी प्यायलेल्या रुग्णांपैकी काही जणांना उपचारांच्या नंतर घरी पाठविण्यात आले आहे. रुग्णांना प्रामुख्याने अतिसार, उलट्या आणि ताप यांचा त्रास होत आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.

कठोर कारवाईचा आदेश

ड इंदूर पाणी दुर्घटना प्रकरणात दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई होणार

ड महानगरपालिकेचे दोन अधिकारी निलंबित, एका अभियंत्याची गच्छंती

ड तीन सदस्यांची समिती स्थापन, एक महिन्यात अहवाल देण्याचा आदेश

Comments are closed.