वसईत बोगस डॉक्टरने घेतला 8 वर्षीय चिमुकलीचा बळी; 2 इंजेक्शन्स दिल्यानंतर नाकातोंडातून रक्तस्राव, वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वसईत एका बोगस डॉक्टरने आठ वर्षांच्या चिमुकलीचा बळी घेतला आहे. उलट्यांचा त्रास होत असल्याने राहुल क्लिनिकमध्ये मरियम अन्सारी (८) हिला नेण्यात आले होते. तिला गोळ्या तसेच दोन इंजेक्शन्स देण्यात आले. मात्र उपचारानंतर दुसऱ्या दिवशी मुलीच्या नाकातोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या तक्रारीवरून वालीव पोलिसांनी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वसई पूर्वेतील भोयदापाडा परिसरात राहणाऱ्या मरियम अन्सारी हिला २८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास उलट्या होण्यास सुरुवात झाली. प्रकृती बिघडल्याने तिची आई तिला राजावळी, पालनगर येथील ‘राहुल क्लिनिक’ मध्ये उपचारासाठी घेऊन गेली. तेथे डॉ. धूपचंद निषाद (४२) याने मरियमची तपासणी करून काही गोळ्या दिल्या. तसेच दोन इंजेक्शन्स दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने मरियमला चहा आणि टोस्ट दिला. त्यानंतर काही वेळातच तिच्या नाकातून आणि तोंडातून अचानक रक्तस्त्राव सुरू झाला. प्रकृती गंभीर झाल्यानंतर काही वेळातच तिचा मृत्यू झाला. दरम्यान चिमुकलीच्या शवविच्छेदन अहवालानंतर तिच्या मृत्यूचे अचूक कारण स्पष्ट होईल. त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाने घेतली झाडाझडती

पालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित क्लिनिकची झाडाझडती केली. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांच्या माहितीनुसार धूपचंद निषाद स्वतःकडे ‘इलेक्ट्रो होमिओपॅथी’ची पदवी असल्याचे सांगत होता. मात्र त्याच्याकडे महाराष्ट्र वैद्यद्यकीय परिषदेची मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी नसल्याचे तपासणीत आढळल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तसेच तो अॅलोपॅथीची औषधे व इंजेक्शन्स देत असल्याचा आरोप आहे. पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवासराव दुधमल यांनी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर निषाद याच्याविरोधात गुन्हा दाखल केला गेला. दरम्यान धूपचंद निषाद याने सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे चिमुकलीच्या मृत्यूमागील नेमके वैद्यकीय कारण शवविच्छेदन अहवाल व पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Comments are closed.