पॅरिसमध्ये धुमस्टाईल चोरी, 800 कोटींचे दागिने घेऊन चोर फरार

हृतिक रोशनच्या ‘धूम-2’ चित्रपटासारखी पॅरिसमध्ये चोरी झाली आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील लूव्हर म्युझियममध्ये चोरांनी अवघ्या 7 मिनिटांत 800 कोटी रुपयांचे दागिने चोरून नेले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही संपूर्ण घटना सकाळी 9 ते 9.30 या वेळेत घडली, जेव्हा संग्रहालयात पर्यटकांची मोठी गर्दी होती.

पोलिस आणि संग्रहालयातील सुरक्षारक्षकांना याची कल्पनाच नव्हती की एवढ्या सहजतेने चोरी होऊ शकते. प्रत्यक्षात चोरांनी एक हायड्रॉलिक ट्रकवापरला ज्यामध्ये शिडी लावलेली होती. हा ट्रक संग्रहालयाच्या मागील बाजूस, तलावाजवळ उभा केला आणि त्या शिडीच्या साहाय्याने दुसऱ्या मजल्याच्या खिडकीपर्यंत पोहोचले. त्यानंतर बॅटरीवर चालणाऱ्या कटरने काच कापून ते संग्रहालयात शिरले.

पॅरिससारख्या अत्यंत सुरक्षित शहराच्या मध्यभागी असलेल्या या संग्रहालयात केवळ 7 मिनिटांत चोरी पूर्ण करण्यात आली. चोर खिडकीतून आत आले, त्यांनी सुरक्षारक्षकांना धमकावून जागा रिकामी करून घेतली. त्यानंतर काचेच्या पेटीत ठेवलेले दुर्मिळ आणि मौल्यवान दागिने त्यांनी आपल्या पिशव्यांमध्ये भरले आणि पुन्हा खिडकीतून खाली ट्रकजवळ उतरले. पळण्यासाठी त्यांनी ट्रक न वापरता स्कूटरचा वापर केला, जेणेकरून अरुंद गल्ल्यांमधून लवकर पळता येईल आणि लपण्यासाठी जागा सापडेल. हे सगळे काम फक्त 7 मिनिटांत पूर्ण झाले.

फ्रान्सच्या संस्कृती मंत्रालयाने या चोरीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे सर्व दागिने 19व्या शतकातील आहेत. हे दागिने फ्रान्सच्या राजघराण्याचे आणि साम्राज्याचे प्रतीक मानले जातात. चोरांनी एकूण 8 मौल्यवान वस्तू चोरल्या असून त्यात राजघराण्याचा मुकुट, नेकलेस, कानातले आणि ब्रोच यांचा समावेश आहे. सर्व दागिन्यांमध्ये हजारो हिरे आणि इतर मौल्यवान रत्ने जडवलेली आहेत. घटनास्थळी दोन मौल्यवान वस्तू पडलेल्या अवस्थेत सापडल्या, ज्या चोरांना घेऊन जाता आल्या नाहीत.

चोरांनी फ्रान्सचे सम्राट नेपोलियन तिसरे यांच्या पत्नी महाराणी यूजीन यांचा मुकुट आणि ब्रोच देखील चोरला आहे. त्याशिवाय महाराणी लुईझ यांचा पन्न्यांचा हार आणि कानातलेही चोरून नेले. महाराणी मेरी-अमेली आणि महाराणी हार्तेंस यांच्या निळ्या नवरत्नांनी (सॅफायर) बनवलेल्या मुकुट, हार आणि कानातल्यांसह एक रिकव्हरी ब्रोचदेखील चोरी झाला आहे. काही नेकलेसमध्ये हजारपेक्षा जास्त हिरे आहेत, तर एका नेकलेसमध्ये तब्बल दोन हजार हिरे बसवलेले आहेत. या सर्व दागिन्यांची एकत्रित किंमत सुमारे 8.8 दशलक्ष युरो, म्हणजेच जवळपास 800 कोटी रुपये इतकी आहे.

Comments are closed.