Mahakumbh 2025 : 12 वर्षांतून एकदाच भरणारा महाकुंभ मेळा

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभाची तयारी जोरात सुरू आहे. त्यासाठी महाकुंभमेळा जिल्ह्याचीही निर्मिती करण्यात आली आहे. प्रयागराजमध्ये दर 12 वर्षांनी महाकुंभ आयोजित केला जातो. महाकुंभ हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यांपैकी एक आहे आणि हिंदू धर्मासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. हे प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र संगमाच्या काठावर आयोजित केले जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की महाकुंभाचे आयोजन दर 12 वर्षांनीच का केले जाते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घेऊयात आजच्या या लेखातून.

महाकुंभ 2025 कधी सुरू होईल?

उत्तर प्रदेशमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत प्रयागराज महाकुंभ मेळा आयोजित केला जाणार आहे. महाकुंभात सहभागी होण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून कोट्यवधी भाविक प्रयागराज किंवा महाकुंभमेळा जिल्ह्यात पोहोचणार आहेत. महाकुंभ दरम्यान प्रयागराजमध्ये संगमच्या काठावर स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. असं मानलं जातं की या स्नानाने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते.

महाकुंभ दर 12 वर्षांनीच का होतो?

महाकुंभमेळा 12 वर्षांनंतरच का होतो, या प्रश्नाचे उत्तर पौराणिक कथांमध्ये सापडते. वास्तविक महाकुंभ हा समुद्रमंथनाशी संबंधित मानला जातो. या वेळी मंथनातून अमृत बाहेर पडले ज्यावर देव आणि दानवांचे युद्ध झाले. असे मानले जाते की अमृत कलशाचे काही थेंब बाहेर पडले आणि पृथ्वीवरील 4 ठिकाणी पडले – प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. या 4 ठिकाणीच कुंभ आयोजित केला जातो. असे मानले जाते की देव आणि दानवांमध्ये 12 दिवस युद्ध झाले, जे मानवी आयुष्याच्या 12 वर्षांच्या बरोबरीचे आहे. यामुळेच 12 वर्षांनंतर महाकुंभाचे आयोजन केले जाते. याआधीचा कुंभमेळा 2013 मध्ये झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये अर्ध कुंभमेळा झाला होता. अर्ध कुंभमेळा दर सहा वर्षांनी होतो.

कुंभमेळ्याच्या महत्त्वाच्या तारखा :

13 जानेवारी 2025: पौष पौर्णिमा
14 जानेवारी 2025: मकर संक्रांती (पहिले शाही स्नान)
29 जानेवारी 2025: मौनी अमावस्या (दुसरा शाही स्नान)
3 फेब्रुवारी 2025: वसंत पंचमी (तृतीय शाही स्नान)
4 फेब्रुवारी 2025: अचला सप्तमी
12 फेब्रुवारी 2025: माघी पौर्णिमा
26 फेब्रुवारी 2025: महाशिवरात्री (शेवटचे स्नान)

40 कोटींहून अधिक लोक येण्याची शक्यता :

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ 2025 मध्ये 40 कोटींहून अधिक भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. 2013 च्या कुंभाच्या तुलनेत 2025 मध्ये प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्याची राखून ठेवलेली जागा दुप्पट ठेवण्यात आली आहे. योगी सरकारने महाकुंभ 2025 च्या आयोजनासाठी 2,600 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद केली होती. महाकुंभ दरम्यान चांगल्या प्रशासनासाठी, यूपी सरकारने महाकुंभ क्षेत्राला नवीन जिल्हा म्हणून घोषित केले आहे.

प्रयागराज हा तीर्थक्षेत्रांचा राजा :

उत्तर प्रदेशातील प्रयागराजचे वर्णन धर्मग्रंथात तीर्थराज म्हणजेच तीर्थक्षेत्रांचा राजा असे केले आहे. पहिला यज्ञ ब्रह्मदेवाने प्रयागराजमध्येच केला होता अशीही एक मान्यता आहे. असे मानले जाते की कुंभमेळ्यात स्नान केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होते. 2017 मध्ये युनेस्कोने कुंभमेळ्याला ‘मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा’ असा दर्जा दिला होता.

हेही वाचा : Health Tips : हिवाळ्यात बॉडी मसाज करण्याचे जबरदस्त फायदे


संपादन- तन्वी गुंडये

Comments are closed.