Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला तिळाचे लाडू का बनवतात ?

नवीन वर्ष सुरू झाले की या नव्या वर्षात पहिला सण येतो तो म्हणजे मकरसंक्रांत. मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांमध्ये गणला जातो. जेव्हा भगवान सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ दान करणे आणि खिचडी खाल्ल्याने भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो, असे म्हटले जाते.

या वर्षी मंगळवार, 14 जानेवारी रोजी भगवान सूर्य रात्री 9.03 वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे यावर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. या दिवशी तिळाचे लाडू बनवण्याची परंपरा आहे. या दिवशी प्रत्येक घरात तिळाचे लाडू बनवले जातात. भगवान सूर्याला तिळगूळाचे लाडू तयार करून अर्पण केले जातात. अशा परिस्थितीत मकर संक्रांतीला तिळाचेच लाडू का बनवले जातात आणि ते या सणादरम्यानच खाणे का महत्त्वाचे आहे हे जाणून घेऊयात.

– जाहिरात –

मकर संक्रांतीला तिळाचे लाडू का बनवले जातात?

पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान सूर्य आपला मुलगा शनिदेवावर खूप कोपले होते. रागाच्या भरात त्यांनी आपल्या शक्तीने शनिदेवाचे कुंभ राशीत असलेले घर जाळले. यानंतर शनिदेवाने वडिलांची माफी मागितली. तेव्हा भगवान सूर्याचा राग शांत झाला. यानंतर भगवान सूर्याने शनिदेवाला सांगितले की जेव्हाही ते मकर राशीत प्रवेश करतील तेव्हा ते घर धन आणि सुखाने भरून जाईल. मकर राशीला शनिदेवाचे दुसरे घर मानले जाते. यानंतर भगवान सूर्य जेव्हा शनिदेवाच्या मकर राशीत आले तेव्हा पुत्राने आपल्या वडिलांची तीळ आणि गुळाने पूजा केली. वडिलांना तीळ आणि गूळ खायला दिला.

– जाहिरात –

हे करण्यामागील शनिदेवाचं कारण म्हणजे कुंभ राशीतील शनिचं घर जाळल्यानंतर शनिदेवाकडे सूर्यदेवाला देण्यासाठी काहीच शिल्लक नव्हते. त्यामुळेच शनिने जेव्हा तिळगूळाचे दान दिले तेव्हा सूर्यदेव आनंदी झाले. यानंतर ते म्हणाले की जो कोणी मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळाने त्यांची पूजा करेल त्याला शनिदेव आणि इतर देवांचाही आशीर्वाद मिळेल. त्यामुळेच मकर संक्रांतीला तिळाचे लाडू बनवून खाण्याची परंपरा आहे.

हे आहे शास्त्रीय कारण :

मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात येतो. या सणाच्या वेळी वातावरणातील गारठा प्रचंड वाढलेला असतो. अशावेळी शरीराला ऊर्जा मिळवून देऊ शकणाऱ्या पदार्थांची आवश्यकता असते. तीळ आणि गूळ हे उष्णतावर्धक पदार्थ म्हणून ओळखले जातात. हिवाळ्यात तिळगूळाचे लाडू तयार करून खाल्ल्यास शरीरातील ऊर्जेची कमतरता भरून निघते. म्हणून मकर संक्रांतीला तिळगूळाचे लाडू खाण्याला विशेष महत्त्व आहे.

हेही वाचा : मकर संक्रांती 2025 : मकर संक्रांत का साजरी केली जाते?


संपादन- तन्वी गुंडये

Comments are closed.