Holi 2025 : होळीला रंग खेळण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली?
दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी साजरा होणारा होळीचा सण हा सर्वांसाठी उत्साह आणि ऊर्जा घेऊन येतो. विविध रंगांनी भरलेला हा सण समाजातील सर्व प्रकारचे भेदभाव विसरून समानतेचा संदेश देतो. या दिवशी सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. लोक एकमेकांना रंग खेळून, गुलाल उधळून आणि मिठाईची देवाणघेवाण करून शुभेच्छा देतात. हा उत्सव केवळ रंगांचा नव्हे तर प्रेम, आनंद आणि बंधुत्वाचा आहे. होळीची सुरुवात होलिका दहनाने होते, जी वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक आहे. पौराणिक कथेनुसार, श्रीकृष्ण आणि राधा यांच्या प्रेमाशी संबंधित असलेला हा सण आहे. जाणून घेऊयात या सणाला रंग खेळण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली याविषयी.
यासाठी रंगांनी होतो सण साजरा :
भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्या प्रेमकथेशी होळी संबंधित असल्याचे म्हटले जाते. असे म्हणतात की, भगवान श्रीकृष्णाने मथुरेतील ब्रज येथे राधा आणि गोपिकांसमवेत पहिल्यांदा रंगपंचमी साजरी केली होती. ज्यामुळे रंग खेळण्याची परंपरा सुरू झाली.
श्रीकृष्ण आणि राधा यांची होळी :
भगवान श्रीकृष्णाचा रंग सावळा होता. तर राधा अगदी गोरीपान होती. श्रीकृष्णाला नेहमी असे वाटत असे की राधा त्याला त्याच्या सावळ्या रंगामुळे सोडणार तर नाही ना? यावर माता यशोदाने कृष्णाला समजावले. ती म्हणाली ,”जर राधेचाही रंग तुझ्यासारखाच झाला तर तुमच्यात फरकच राहणार नाही.” हे ऐकून श्रीकृष्ण आपल्या मित्रांसमवेत राधा आणि गोपिकांकडे गेले व त्यांच्यावर गुलालाची उधळण करून त्यांनी होळी खेळली. तेव्हापासून या परंपरेची सुरूवात झाली. आणि दरवर्षी होळी खेळली जाऊ लागली.
होळी सणातील वैविध्य :
मथुरेतील होळी
श्रीकृष्ण आणि राधा जिथे पहिल्यांदा होळी खेळले अशी मान्यता आहे ती मथुरा आणि वृंदावन मध्ये खेळली जाणारी होळी आजही संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे.
बरसानातील लाठीमार होळी
उत्तर प्रदेशातील बरसानामध्ये महिला पुरूषांना काठीने मारतात. आणि पुरूष स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करतात.
फुलांची होळी
वृंदावन मधील मंदिरांमध्ये भगवान श्रीकृष्णासोबत फुलांची होळी खेळली जाते.
गुलालाची होळी
मथुरामधील द्वारकाधीश मंदिर आणि गोकुळात गुलालाने होळी खेळली जाते. जिथे भक्त एकमेकांना रंग लावून या उत्सवाचा आनंद साजरा करतात.
होळी केवळ रंगांचा सण नाही. तर प्रेम, सामाजिक समानता यांचाही संदेश देणारा हा सण आहे. यादिवशी तुम्हीदेखील होळीच्या रंगांत न्हाऊन जा आणि आनंदाने हा सण साजरा करा.
हेही वाचा : Fashion Tips : पार्टीला स्टाइल करा जन्नत जुबेरचे बेस्ट ड्रेसेस
संपादित – तनवी गुडे
Comments are closed.