डीकोडिंग डिमेंशिया'न आंतरराष्ट्रीय संवाद

डॉ. बी. एम. एन. कॉलेज ऑफ होम सायन्स (स्वायत्त) आणि श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला व वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग व ‘आजी केअर सेवक फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिकोडिंग डिमेंशिया: रिसर्च, सोशियोलॉजिकल अप्रोच आणि पाथवेज’ या विषयावर रुसा प्रायोजित एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. परिषदेचे बीजभाषण मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नीलेश शाह यांनी “आजोबा, चला शाळेत जाऊ या” या संकल्पनेच्या माध्यमातून केले. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी फिजिओथेरपी, मानसिक व्यायाम आणि डिजिटल साक्षरता यांचे महत्त्व अधोरेखित केले.

आजी केअर सेवक फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रकाश नारायण बोरगांवकर ह्यांनी सुरुवातीच्या लक्षणांच्या बाबतीत dimentia चा आढावा व परिस्थिती समजाऊन सांगितली.त्यांनी सांगितले की सध्या भारतात 88 लाख ज्येष्ठ नागरिक स्मृतीभ्रंशने ग्रस्त आहे व ही संख्या 2036 मध्ये 1 कोटी 70 लाख होईल. डॉ. संतोष बांगर यांनी डिमेंशियाची कारणमीमांसा, आहार व व्यायामाचे महत्त्व सांगितले, तर डॉ. अर्चना पत्की यांनी कुटुंबातील तरुणांनी वृद्धांच्या भावना समजून घेण्याची गरज अधोरेखित केली.

प्रश्नोत्तरांवर आधारित चर्चासत्रात डॉ. खालप यांनी डिमेंशियाग्रस्त व्यक्तींच्या काळजीत कुटुंबाची भूमिका विशद केली, तर प्रसाद भिडे यांनी काळजीवाहकांची निवड करताना विश्वासार्ह संस्था व निकष यांचे महत्त्व स्पष्ट केले. अ‍ॅड. निर्मला सामंत प्रभावळकर यांनी एमडब्ल्यूपीएससी कायदा, २००७, मानसिक आरोग्य कायदा, २०१७ व अपंग व्यक्तींचे हक्क कायदा, २०१६ यांची माहिती देत मुलांनी आपल्या वृद्ध पालकांना सोडू नये, हा स्पष्ट संदेश दिला.दुपारच्या सत्रात अमेरिकेतील प्राजक्ता पाडगावकर यांनी ‘होप फॉर अल्झायमर’ या सादरीकरणातून निदानातील आधुनिक उपकरणे व काळजी घेण्याच्या उपायांवर प्रकाश टाकला. अमेरिकेतील प्रा. मानसी पै यांनी संज्ञानात्मक वृद्धत्व हे जैविक आणि मानसिक यंत्रणांशी कसे निगडीत आहे, याचे शास्त्रीय विवेचन सादर केले. त्यांच्या मते, फक्त जैविक कारणे नव्हे तर जीवनशैली देखील मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते.

या परिषदेच्या आयोजनात सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार अतुल संघवी, प्राचार्य डॉ. माला पांडुरंग, प्राचार्य डॉ. अर्चना पत्की, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हिना शाह आणि प्रकाश बोरगांवकर यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. देश-विदेशातील ३६५ प्रतिनिधींनी प्रत्यक्ष व आभासी स्वरूपात सहभाग नोंदवला. समाजशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थिनींच्या अथक परिश्रमामुळे ही परिषद अत्यंत यशस्वी झाली.

Comments are closed.