अनावश्यक खर्च वाढतोय? मग बदला या सवयी

अनेकवेळा गरज नसताना आपल्याकडून छोट्या मोठ्या गोष्टींची खरेदी केली जाते. कधी एखादी वस्तू आकर्षक दिसते म्हणून तर कधी आवडली म्हणून आपण ती विचार न करता विकत घेतो. कारण त्यातून आपल्याला हवी ती वस्तू मिळवल्याचा आनंद मिळतो. त्यात आता जी पे (Gpay)सारखे अॅप असल्याने कॅश जवळ नसली तरी खरेदी मात्र करता येते. पण महिन्याअखेरला जेव्हा खिसा रिकामा होऊ लागतो तेव्हा झालेल्या खर्चाचा हिशोब लावताना आपण गरज नसलेल्या अनावश्यक वस्तू का घेतल्या असा प्रश्न प्रत्येकाला हमखास पडतो. यामुळे पैसे सांभाळून कसे खर्च करायचे हे प्रत्येकाला कळायलाच हवे.

अनावश्यक खर्च होऊ नये यासाठी सुरुवातीपासूनच प्रत्येकाने काही सवयी  स्वतःला लावाव्यात. यात प्रामुख्याने बाजारात जाताना जे सामान घ्यायचे आहे त्याची यादी बनवावी. बाजारात गेल्यावर त्याच वस्तू घ्याव्यात. तसेच ज्या वस्तू खराब होत नाहीत त्या जास्त प्रमाणात घ्याव्यात. कारण वस्तू जास्त घेतल्यावर दुकानदार त्यावर डिस्काऊंट देतोच. शिवाय त्या वस्तू संपल्या की बाजारात त्या आणण्यासाठी जी ये जा करावी लागेल ती ही टळते.

तसेच हल्ली सगळेच जण हॉटेलमध्ये जेवायला जातात. किंवा हॉटेलमधून जेवण मागवतात. पण पैसे आहेत म्हणून सतत बाहेरचे खाणे हे चांगले लक्षण नाही. कारण यामुळे फक्त महिन्याचे बजेट कोलमडत नाही तर शरीरावरही त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे सामानाच्या यादीप्रमाणेच आठवड्याच्या मेन्यूचीही यादी बनवावी.

तसेच जेव्हा तुम्ही शॉपिंगसाठी जाता तेव्हाही उगाच आवडले म्हणून कपडे किंवा वस्तूंची घे घे करू नये. त्याची तुम्हाला खरंच गरज आहे का त्याचा विचार करावा. प्रामुख्यामे महिलांना सतत साडी किंवा ड्रेसेस घेण्याचा हव्यास असतो. एका कार्यक्रमात नेसलेली साडी, ड्रेस दुसऱ्या कार्यक्रमात नेसणे त्यांना कमीपणाचे वाटते. अशावेळी त्या सतत नवीन कपड्यांचा ध्यास घेतात. यामुळे अनावश्यक खरेदी होत राहते. दुसऱ्यांना मोठेपणा दाखवण्यात कपाटात कपड्यांचा डोंगर वाढत राहतो. मग कपाटही लहान पडते. यामुळे खर्च करताना भान बाळगणे गरजेचे आहे.

हाच नियम घरात वस्तू खरेदी करताना लागू होतो. जर तुमचे कुटुंब लहान असेल तर भलामोठ्या फ्रिजची तुम्हाला गरज नसते. फ्रिज, वॉशिंग मशीन, ओव्हन जेव्हढे मोठे तेवढे विजेचे बिलही मोठे. खरंच तुमच्या छोट्या कुटुंबाला एवढ्या मोठ्या वस्तूची गरज आहे का की त्यातल छोट मॉडेलही पुरेसे आहे याचा विचार करावा. पण हल्ली स्टेटस मिरवण्यासाठी गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी केली जाते.

 

 

Comments are closed.