शरीरावर फोड आणि मुरुमे का येतात?

शरीरावर फोड आणि मुरुम येणे ही एक सामान्य समस्या आहे. पण, वेळेतच यावर उपचार केले नाही तर याचे रुपांतर गंभीर स्वरूपात होऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात. शरीरावरील लाल, सुजलेले, पू असलेले फोड हे आपल्या आरोग्याविषयी अनेक महत्त्वाचे संकेत देतात. जाणून घेऊयात याविषयी सविस्तरपणे,

फोड केव्हा येतात?

जेव्हा बॅक्टेरिया शरीरावरील छिद्रांमध्ये प्रवेश करतात आणि संसर्ग पसरवतात, तेव्हा फोड आणि मुरुमांची समस्या निर्माण होते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती या संसर्गावर प्रतिक्रिया देते, ज्यामुळे जळजळ आणि पू तयार होतो. हल्ली बरेचजण या समस्येने त्रस्त आहेत. पण, तज्ज्ञांच्या मते, बॅक्टेरियाच नाही तर आरोग्याची स्थिती, पर्यावरणीय घटक आणि काही सवयींमुळे फोड आणि मुरुमे येतात.

फोड आणि मुरुमांची कारणे –

वैयक्तिक स्वच्छता न पाळणे –

फोड आणि मुरुमांचे सर्वात मोठे कारण म्हणजे वैयक्तिक स्वच्छता न पाळणे. जेव्हा आपण शरीर नियमितपणे स्वच्छ करत नाही तेव्हा त्वचेवर तेल, घाम आणि बॅक्टेरिया जमा होतात. हे बॅक्टेरिया छिद्रांमध्ये प्रवेश करतात आणि संसर्ग निर्माण करतात, ज्यामुळे फोड आणि मुरुमे येतात. म्हणून नियमितपणे अंघोळ करून त्वचा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.

कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती –

जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर शरीर बाहेरील बॅक्टेरियांशी लढू शकत नाही. विशेष करून डायबिटीस आणि दीर्घकाळ कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला फोड येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी निरोगी जीवनशैली, संतुलित आहार आणि पुरेशी झोप घ्यावी.

पचनक्रिया बिघडल्यावर –

जेव्हा शरीराची पचनसंस्था योग्यरित्या काम करत नाही, तेव्हा शरीर अन्नातील विषारी पदार्थ पूर्णपणे काढून टाकू शकत नाही. परिणामी, हे विषारी पदार्थ रक्तात जमा होतात. ज्यामुळे संसर्ग होऊन फोड आणि मुरुमे येतात.

हार्मोनल असंतुलन आणि स्ट्रेस –

हार्मोनल असुंतलन आणि स्ट्रेसमुळे फोड आणि मुरुमे येतात. स्ट्रेसमुळे शरीरात कॉर्टिसोल हार्मोन्स देखील वाढतात, ज्यामुळे त्वचेमध्ये तेलाचे उत्पादन वाढू शकते. परिणामी, छिद्रे बंद होतात आणि फोड येतात.

 

हेही पाहा –

Comments are closed.