घरात आणलेला खाऊ ठरू शकतो धोकादायक, जाणून घ्या लपलेले दुष्परिणाम

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत लोक खरेदीसाठी मॉल, सुपरमार्केट किंवा किराणा दुकानात जातात आणि सेल पाहून अनेक पॅकेज्ड खाण्याच्या वस्तू घरी आणतात. पण हे पदार्थ खरोखरच सुरक्षित आहेत का? त्यांचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो? हे फार कमी लोकांना ठाऊक असते.

“जसे खाल तसे दिसाल” हे वाक्य फक्त म्हण नाही, तर प्रत्यक्ष जीवनातही तितकेच लागू होते. आपण जे खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर आणि शरीरावर होतो. काही पदार्थ तात्पुरते चविष्ट आणि सोयीचे वाटतात, पण ते दीर्घकाळात गंभीर आजारांना आमंत्रण देतात.

फळांचे रस आणि गोड पेये

“100 टक्के नैसर्गिक” असा टॅग असला तरी पॅकेज्ड रस पूर्णपणे आरोग्यदायी नसतो. अशा रसामध्ये पाणी, कृत्रिम चव आणि अतिरिक्त साखर असते. शिवाय फायबर वेगळे केल्यामुळे त्यातून खरी पोषणमूल्ये मिळत नाहीत. थेट फळ खाल्ले तर जास्त फायबर मिळते, पोट भरते आणि आरोग्यही चांगले राहते.

प्रो-बायोटिक पूरक

बाजारात उपलब्ध सप्लिमेंट्स शरीरासाठी नेहमीच उपयुक्त ठरतात असे नाही. त्यापेक्षा नैसर्गिक आंबवलेल्या पदार्थांमधून (जसे दही, लापशी, इडली) प्रोबायोटिक मिळवणे अधिक फायदेशीर ठरते. हे पदार्थ आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात.

शुगर-फ्री बिस्किटे

“डायबेटिक फ्रेंडली” किंवा “शुगर-फ्री” नावाखाली विकली जाणारी बिस्किटे निरुपद्रवी वाटतात. पण त्यात कृत्रिम गोड पदार्थ, रसायने आणि पचनास त्रास देणारे घटक असतात. त्यामुळे रक्तातील साखरेवर आणि आतड्यांतील सूक्ष्मजीवांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

प्रोसेस्ड मांस आणि फ्रोझन फूड

कबाब, सॉसेज, नगेट्ससारखे प्रोसेस्ड मांसाहारी पदार्थ आणि फ्रोजन फूड्स चविष्ट वाटतात. पण त्यावर अनेकदा प्रक्रिया केलेली असते आणि टिकवण्यासाठी रसायने मिसळलेली असतात. असे पदार्थ वारंवार खाल्यास आतड्यांमध्ये जळजळ होणे, पचनाचे आजार वाढणे, दीर्घकाळात हृदयविकार किंवा इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात.

पॅकेज्ड लस्सी आणि दही

अशा उत्पादनांमध्ये अनेकदा कृत्रिम चव आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. ज्यांना लॅक्टोजची समस्या आहे किंवा साखरेबाबत संवेदनशीलता आहे, त्यांच्यासाठी तर हे अधिक धोकादायक ठरू शकते. साधं दही घेऊन त्यात फळांचे तुकडे घालणे हा पर्याय अधिक सुरक्षित आहे.

इन्स्टंट नूडल्स आणि स्नॅक्स
भारतीय घराघरात लोकप्रिय असलेले इन्स्टंट नूडल्स, चिप्स किंवा फ्रोजन स्नॅक्स हे परवडणारे व झटपट खाणे असले तरी त्यात रिफाइंड पीठ, एमएसजी, पाम तेल आणि जास्त सोडियम असते. यामुळे पचनाच्या समस्या, पोटफुगी आणि दीर्घकाळात लठ्ठपणा होऊ शकतो.

परिष्कृत तेल

सूर्यफूल, सोयाबीन किंवा करडईसारखी रिफाइंड तेलं रोजच्या स्वयंपाकात वापरली जातात. पण या तेलांवर अनेक रासायनिक प्रक्रिया झाल्यामुळे त्यातील नैसर्गिक गुणधर्म कमी होतात. अशा तेलांमध्ये ओमेगा-६ फॅटी ॲसिडचे प्रमाण जास्त असते, जे शरीरात जास्त प्रमाणात गेले तर चयापचय विकार आणि दाह निर्माण करतात.

बाजारातील आकर्षक पॅकेजिंग, चमकदार जाहिराती आणि “हेल्दी” अशा लेबलांना भुलून खरेदी करणे धोकादायक ठरू शकते. पॅकेज्ड किंवा प्रोसेस्ड पदार्थांपेक्षा घरगुती, ताजे आणि नैसर्गिक अन्न अधिक सुरक्षित आहे. शरीराचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर बाजारातील झगमगाटापेक्षा स्वच्छ, सोप्या आणि पारंपरिक खाण्यावर भर द्यायला हवा.

Comments are closed.