कामात लक्ष न लागणे म्हणजे क्वाइट क्रॅकिंग; मानसिक आजाराविषयी तज्ञ काय सांगतात?
ऑफिसचा विचार करूनच तुम्हाला थकवा जाणवतो का? आठवड्याच्या मध्यभागीच अचानकच सुट्टी घ्यायची इच्छा होते का? मग तुम्हाला क्वाइट क्रॅकिंगचा त्रास होत असण्याची शक्यता आहे. आता हा शब्द तुम्हाला नवीनच असेल. पण हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. नकळतपणे अनेक जण आजच्या घडीला या आजाराचे बळी पडत आहेत. हा आजार नेमका काय आहे? त्यावर उपाय काय? सर्व काही जाणून घेऊया..
क्वाइट क्रॅकिंग म्हणजे काय?
क्वाइट क्रॅकिंग ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये कर्मचाऱ्याला हळूहळू काम करण्याची इच्छा नाहीशी होते. सुरुवातीला हे अत्यंत सामान्य वाटत असले तरी कालांतराने यामध्ये वाढ होते आणि त्याचे रूपांतर एका मानसिक आजारात होते.
अहवाल काय सांगतो?
अलीकडेच एका अहवालात या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. स्टेट ऑफ द ग्लोबल वर्कप्लेसच्या अहवालात असे दिसून आले आहे की केवळ 21 टक्के कर्मचारी हे सक्रियपणे त्यांच्या कामात गुंतलेले आहेत. ही एक धक्कादायक आकडेवारी आहे. म्हणजे एखाद्या ऑफिसमधले केवळ 5 पैकी 1 व्यक्ती सक्रियपणे काम करत आहे.
तज्ञ काय सांगतात?
तज्ञांच्या मते, मानसिकदृष्ट्या तुमची हळूहळू काम करण्याची इच्छा मरत असते. यामागे अनेक कारणे असू शकतात. वाईट व्यवस्थापन, विकासाच्या संधींचा अभाव, ऑफिस कल्चर, कंफर्ट झोन सोडण्याची भीती ही क्वाइट क्रॅकिंगची कारणे असू शकतात. यामुळे कामाप्रती तुमची ऊर्जा, महत्त्वाकांक्षा आणि उत्साह कमी होऊ लागतो.
उपाय
याला तोंड देण्यासाठी पहिले पाऊल म्हणजे जागरूकता. कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये जर परकेपणाची भावना असेल तर ती ओळखली पाहिजे. जसे की उत्पादनात घट, बैठकांमध्ये शांतता, कामात न दिसणारा उत्साह, इ. याशिवाय कर्मचाऱ्यांनीही एखाद्या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. तज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व्यवस्थापकाशी मोकळेपणाने बोलले पाहिजे. तुमच्या भावना, तुमच्या गरजा शेअर केल्या पाहिजे. एक संवाद, नवीन संधी, यामुळे तुम्हाला पुन्हा कामात उत्साह जाणवेल.
Comments are closed.