Pitru Paksha 2025: केवळ भारतच नव्हे या देशातही पूर्वजांना समर्पित खास दिवस
भारतात हिंदू धर्मात पितृपक्षाला अत्यंत महत्त्व असून या दिवसांत पुर्वजांचे स्मरण केले जाते. या काळात पूर्वज आपल्या घरी येतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात अशी मान्यता आहे. त्यासाठी पितरांना आवडणारे पदार्थ तयार केले जातात. मात्र केवळ भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांत पूर्वजांना खास दिवस समर्पित असतो. या दिवशी या देशांमध्येही पूर्वजांचे स्मरण करण्याची प्रथा आहे. ते देश कोणते हे जाणून घेऊया…
जर्मनी
जर्मनीमध्ये ‘ऑल सेंट्स डे’ दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतात. या दिवशी लोक स्मशानात जातात आणि मेणबत्त्या पेटवू श्रद्धांजली अर्पण करतात.
चीन
चीनमध्ये दरवर्षी ४ किंवा ५ एप्रिल रोजी ‘छींग मिंग’ हा सण साजरा केला जातो. या दिवशी लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात. स्मशानभूमीत जाऊन कब्रीजवळची जागा स्वच्छ करतात आणि श्रद्धांजली वाहतात. तसेच प्रथेनुसार या दिवशी पुर्वजांना थंड अन्न अर्पण करणे शुभ मानले जाते आणि कुटुंबातील सदस्यही थंड अन्न खातात.
जपान
जपानी कॅलेंडरनुसार, ऑगस्टच्या शेवटच्या १५ दिवसांत ‘बॉन फेस्टिव्हल’ साजरा केला जातो. या काळात लोक त्यांच्या पूर्वजांना श्रद्धांजली वाहतात आणि कबरीजवळ फुले अर्पण करतात. या दिवशी दिवे लावून घर उजळले जाते. तसेच गाणी गाणे, पूर्वजांच्या नावाने दिवे नदीत ठेवण्याची प्रथा आहे.
इतर आशियाई देश
सिंगापूर, थायलंड, श्रीलंका आणि व्हिएतनामसारख्या अनेक आशियाई देशांमध्ये बौद्ध आणि ताओ धर्माशी संबंधित परंपरांनुसार पूर्वजांचा आदर केला जातो. या देशांमध्येही पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी सण साजरे केले जातात, ज्यामध्ये कंदील लावणे आणि विशेष प्रार्थना करणे समाविष्ट आहे.
Comments are closed.