Baby Care Tips: बाळाला ताप आला तर अंघोळ घालावी का?

घरात लहान बाळ असेल, तर प्रत्येक पालकाला बाळाच्या आरोग्याबद्दल अगदी बारकाईनं काळजी घ्यावी लागते. विशेषतः बाळाला ताप आल्यावर एक प्रश्न हमखास निर्माण होतो बाळाला अंघोळ घालावी का? अनेक पालक गोंधळून जातात की अंघोळ घातली तर ताप वाढेल की कमी होईल? प्रत्यक्षात, योग्य परिस्थितीत बाळाला अंघोळ घालणं फायद्याचं ठरू शकतं.

(तापाच्या टिप्स दरम्यान बाळ आंघोळ)

ताप असतानाही अंघोळ का उपयुक्त असू शकते?

ताप किंवा व्हायरल इन्फेक्शनदरम्यान अंघोळ केल्याने बाळाला आराम मिळतो. अंघोळ घातल्यानं बाळाच्या अंगावर आलेला घाम, चिकटपणा आणि अशुद्धी दूर होते. शरीर स्वच्छ झाल्यानं अंगदुखी, थकवा आणि जडपणा कमी होतो.

याशिवाय, थंड पाण्याने नाही तर कोमट पाण्याने अंघोळ घातल्यास बाळाला फ्रेश वाटतं, त्यांची झोप सुधारते आणि बरे होण्याची प्रक्रिया जलद होते. शरीर स्वच्छ ठेवल्याने व्हायरल लोड कमी होतो आणि इन्फेक्शनशी लढायला शरीर सक्षम होतं.

कधी अंघोळ घालू नये?

– जर बाळ खूपच अशक्त वाटत असेल, झोपूनच राहात असेल.

– जर ताप खूपच जास्त असेल आणि बाळ अॅक्टिव्ह नसेल.

– जर डॉक्टरांनी अंघोळ टाळण्याचा सल्ला दिला असेल.

अशा वेळी अंघोळ घालण्याऐवजी स्पंज बाथ देणं अधिक योग्य ठरतं. ओल्या टॉवेलने अंग पुसून दिल्यास बाळाला आराम मिळतो आणि ताप नियंत्रणात ठेवता येतो.

पालकांनी काय लक्षात ठेवावं?

– अंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करावा.

– बाथरूममध्ये थंड वारा लागू नये, याची काळजी घ्यावी.

– अंघोळीनंतर लगेच बाळाला कोरडं करून उबदार कपडे घालावेत.

– ताप खूप वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बाळाला ताप आला असतानाही योग्य वेळ, योग्य पद्धती आणि काळजी घेतली तर अंघोळ घालणं हानिकारक ठरत नाही, उलट ते आरोग्यासाठी उपयुक्त असू शकतं. पण जर बाळ खूपच अशक्त असेल, तर अंघोळ घालण्याऐवजी स्पंज बाथ हा उत्तम पर्याय आहे.

Comments are closed.