Shardiya Navratri 2025: नवरात्रीचा उपवास केल्यावर चहा- कॉफी घ्यावी का? जाणून घ्या फराळाचे नियम
शारदीय नवरात्री हा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. दरवर्षी शारदीय नवरात्रीची स्थापना अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते. या काळात नऊ दिवस देवीच्या नऊ विविध रुपांची पूजा केली जाते. या काळात भाविक मनोभावे देवीची पूजा करत उपवास करतात. आता उपवास केल्यावर आहाराबाबत अनेक प्रश्न पडतात. या दरम्यान, चहा- कॉफी घ्यावी का? किंवा उपवासाला काय खावे? हे सर्व काही जाणून घ्या.
चहा किंवा कॉफी घ्यावी का?
उपवास असल्यावर काही जण चहा- कॉफी घेत नाहीत. त्यामुळे याबाबत गोंधळ होतो. आता खरे तर, उपवासाच्या वेळी चहा पिणे टाळावे. पण उपवास असेल तरी बहुतेकदा लोक चहा घेतात. आता कॉफीबद्दल बोलायचे झाल्यास चहाप्रमाणेच उपवासादरम्यान कॉफी देखील घेतली जाते. त्यामुळे चहा किंवा कॉफी पिण्यावर कोणतेही बंधन नाही.
उपवास केल्यावर काय खावे?
शारदीय नवरात्रीचा उपवास केल्यावर तुम्ही मखाना, शेंगदाणे, बदाम, काजू आणि बटाट्याचे चिप्स स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. साबुदाण्याची खिचडी, भगर, राजगिऱ्याच्या पिठाचे थालीपीठ, पुरी किंवा शिरा बनवू शकता. उपवासात तुम्ही सर्व प्रकारची फळे खाऊ शकता. यासोबतच, तुम्ही दूध आणि दह्यापासून बनवलेले पदार्थ देखील खाऊ शकता.
उपवास केल्यावर काय खाऊ नये?
उपवास असल्यावर कांदा, लसूण, मुळा खाणे निषिद्ध मानले जाते. उपवासात तुम्ही गहू, तांदूळ, बाजरी, मका इत्यादी कोणत्याही प्रकारचे धान्य खाऊ शकत नाही. उपवासात सामान्य मीठ देखील वापरले जात नाही. याशिवाय, नवरात्रीच्या दिवसांत मांसाहार आणि मद्यपान टाळावे.
कधीपासून सुरू होत आहे नवरात्री?
हिंदू पंचांगानुसार, या वर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबर 2025 पासून होणार आहे आणि 2 ऑक्टोबर 2025 रोजी विजयादशमी असणार आहे. आता यंदाचा नवरात्री उत्सव खास असणार आहे कारण हा उत्सव यंदा नऊ नव्हे तर दहा दिवसांचा असणार आहे. यामागे एक प्रमुख कारण सांगण्यात येत आहे. ते कारण म्हणजे यंदा तृतीया तिथी ही दोन दिवस असणार आहे. म्हणजेच 24 आणि 25 सप्टेंबर रोजी दोन्ही दिवस तृतीया तिथी असेल. त्यामुळेच यंदा 11 व्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे.
Comments are closed.