Silver Jewellery Polish Tips: चांदीचे दागिने काळे पडलेत का? फॉलो करा या टिप्स, 15 मिनिटांत येईल चमक
आता गणेशोत्सव झाला आणि नवरात्री अगदी तोंडावर आहे. अशातच तुमच्या घरी साफसफाईची कामं सुरू झाली असतील. महिला दररोज पैंजण किंवा अंगठ्या घालतात. त्यामुळे रोजच्या वापरामुळे चांदीची चमक कमी होते. शिवाय चांदीचे दागिने दररोज वापरल्याने काळे पडतात. तुम्हाला सण- उत्सवासाठी चांदीचे दागिने किंवा भांडे पॉलिश करायचे असतील तर त्यासाठी आता बाहेर सराफांकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही काही सोप्या टिप्स वापरून अगदी घरच्या घरी चांदीचे भांडे आणि दागिने चमकवू शकता.
साबण आणि कोमट पाणी
एका भांड्यात कोमट पाणी घ्या. त्यामध्ये चांदीच्या वस्तू टाकून ठेवा. काही वेळाने ते बाहेर काढा आणि हाताने साबण लावून घासून घ्या. घासून झाल्यावर पुन्हा एकदा कोमट पाण्याने या वस्तू धुवा. यानंतर सुती कापडात हे दागिने चांगले पुसून घ्या.
बेकिंग सोडा आणि पाणी
चांदीच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा चांगला पर्याय आहे. यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात एक चमचा बेकिंग सोडा घाला. आता याची पेस्ट बनवून घ्या आणि ही पेस्ट ब्रशच्या मदतीने चांदीच्या दागिन्यांवर लावा काही वेळ तसेच ठेवा. थोड्या वेळाने ते हलक्या हाताने घासून घ्या. या ट्रिकने काळ्या पडलेल्या चांदीच्या वस्तूंना लगेच चमक येईल.
अॅल्युमिनियम फॉइल
अॅल्युमिनियम फॉइलचाही वापर करता येईल. यासाठी एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात अॅल्युमिनियम फॉइलचा तुकडा घाला. आता त्यात दोन चमचे बेकिंग सोडा आणि थोडे मीठ घाला. त्यानंतर वस्तू त्यात १० मिनिटे बुडवून ठेवा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
Comments are closed.