Parenting Tips: लहान बाळाला खूप काजळ लावता? डोळ्यांवर होतील गंभीर परिणाम

आपल्याकडे लहान बाळांच्या डोळ्यांना काजळ लावतात. नजर न लागण्यासाठी किंवा डोळे मोठे होण्यासाठी बाळांना भरपूर काजळ लावले जाते. पण तुम्ही कधी त्यामुळे काय परिणाम होतात याचा विचार केला आहे का? काजळ लावल्याने डोळे जरी सुंदर दिसत असले तरी नवजात बाळांचे डोळे हे संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांना जास्त काजळ लावल्याने त्यांना डोळ्याच्या समस्या होऊ शकतात.

काजळ लावल्याने खरंच डोळे मोठे होतात का?
काजळ लावल्याने खरंच डोळे मोठे होतात का? हा प्रश्न पडतो. पण तज्ञांच्या मते, लहान मुलाच्या डोळ्यांना काजळ लावल्याने डोळ्याचा आकार वाढतो हा समज पूर्णपणे खोटा आहे. नेत्ररोगशास्त्रानुसार, डोळ्याचा आकार आणि दृष्टी ही नैसर्गिक बाब आहे आणि काजळ लावल्याने त्यावर कोणताही परिणाम होत नाही.

बाळांच्या डोळ्यांना काजळ लावण्याचे नुकसान
बाळांचे डोळे खूप नाजूक असतात आणि त्यांना काजळ लावल्याने नुकसान होऊ शकते. बाजारात उपलब्ध असलेले काजळ पूर्णपणे स्वच्छ किंवा निर्जंतुक केलेले नसतात, ज्यामुळे डोळ्यांच्या संसर्गाचा धोका वाढतो. काजळ लावल्याने डोळ्यांत जळजळ, खाज सुटणे आणि सतत पाणी येणे असा त्रास होऊ शकतो. डोळ्यांत काजळ गेल्यास ऑइल ग्लॅन्ड ब्लॉक होऊ शकतात, ज्यामुळे डोळ्यांना सूज येण्याची समस्या वाढू शकते. शिवाय, आजकाल बाजारात उपलब्ध असणाऱ्या काजळात असे रसायने असतात जी लहान मुलांच्या नाजूक डोळ्यांना हानी पोहोचवू शकतात.

डॉक्टरांचा सल्ला काय?
डॉक्टरांच्या मते, काजळ कधीही मुलांच्या डोळ्यांना लावू नये, कारण ते त्यांच्या नाजूक डोळ्यांसाठी असुरक्षित आहे. डोळ्यांऐवजी बाळाच्या कपाळावर किंवा कानाच्या मागे काजळ लावू शकता. तसेच काजळ लावल्याने मुलांचे डोळे मोठे होतात याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. म्हणूनच डॉक्टर सल्ला देतात की बाळाच्या डोळ्यांना कधीही काजळ लावू नये.

Comments are closed.