मुलांची उंची वयानुसार किती वाढली पाहिजे? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात
प्रत्येक पालकांसाठी त्यांच्या मुलांची वाढ ही नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो. वजनाबरोबरच उंची ही मुलांच्या आरोग्याचे महत्त्वाचे निदर्शक मानली जाते. लहान वयापासून योग्य आहार, वेळेवर आरोग्य तपासणी आणि जीवनशैली यावर मुलांची वाढ ठरते. परंतु मुलांची उंची त्यांच्या वयानुसार योग्य आहे का, हे ओळखण्यासाठी काही ठराविक मापदंड आहेत. पालकांनी याची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे.
पहिलं वर्ष सर्वात महत्त्वाचं
जन्मानंतरच्या पहिल्या वर्षात मुलांची वाढ सर्वात वेगाने होते. या काळात वजनाबरोबरच उंचीतही मोठा फरक दिसतो. साधारणपणे पहिल्या वर्षात मुलांची उंची 25 सेंटीमीटरपर्यंत वाढते.
दुसरं आणि तिसरं वर्ष
दुसऱ्या वर्षी मुलांची उंची अंदाजे 12 ते 13 सेंटीमीटरपर्यंत वाढते. तिसऱ्या वर्षी ही वाढ थोडी कमी होते आणि साधारण ७ ते 10 सेंटीमीटरच्या दरम्यान राहते.
तीन ते सहा वर्षे
या वयोगटात मुलांची उंची दरवर्षी 6 ते 7 सेंटीमीटर इतकी वाढत जाते. या काळात मुलांच्या आहारावर आणि झोपेवर विशेष लक्ष देणे गरजेचे असते.
सहा वर्षांनंतर
सहा वर्षांपासून पौगंडावस्था सुरू होईपर्यंत दरवर्षी उंची साधारण 5 सेंटीमीटर वाढते. पौगंडावस्थेत पुन्हा एकदा वाढीचा वेग वाढतो आणि या काळात मुलांची उंची जलद गतीने वाढू शकते.
मुलांची उंची तपासणं का महत्त्वाचं?
– उंची ही मुलांच्या पोषणस्थितीचे आरशासारखे प्रतिबिंब असते.
– वयानुसार उंची न वाढल्यास पोषणाची कमतरता किंवा इतर आरोग्य समस्या असू शकतात.
– वेळेवर लक्ष दिल्यास लहान वयातच आवश्यक बदल करून योग्य वाढ साधता येते.
मुलांची उंची ही त्यांच्या एकूण वाढीचा आणि आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे पालकांनी नियमितपणे मुलांची उंची मोजावी आणि वयानुसार ती योग्य आहे का, हे तपासावे. योग्य आहार, व्यायाम आणि झोप ही मुलांच्या नैसर्गिक वाढीसाठी अत्यावश्यक आहेत.
Comments are closed.