Smoking Effects: पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे काय? त्याचा शरीरावर होणारा गंभीर परिणाम जाणून घ्या
धूम्रपान करणे आरोग्यासाठी घातक आहे, हे आपण नेहमी ऐकतो. मात्र, धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींनाही याचा धोका तितकाच गंभीर आहे. यालाच पॅसिव्ह स्मोकिंग किंवा सेकंडहँड स्मोक म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याने ओढलेल्या सिगारेट, सिगार किंवा पाईपचा धूर नकळत शरीरात घेतो, तेव्हा त्याला पॅसिव्ह स्मोकिंगचा फटका बसतो. हा अप्रत्यक्ष धूरसुद्धा शरीराला तितकाच हानिकारक आहे.
पॅसिव्ह स्मोकिंगचे गंभीर दुष्परिणाम
कॅन्सरचा धोका : पॅसिव्ह स्मोकिंगच्या धुरामध्ये ७,००० पेक्षा जास्त हानिकारक रसायने असतात. त्यापैकी बरीचशी रसायने कर्करोगास कारणीभूत ठरतात.
त्यामुळे धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींमध्येही फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका २० ते ३० टक्क्यांनी वाढतो.
हृदयविकार वाढतो : धुरामुळे रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचते. यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसा अरुंद होतात. परिणामी हृदयविकाराचा झटका व स्ट्रोकचा धोका वाढतो.
लहान मुलांवर परिणाम : पॅसिव्ह स्मोकिंगचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसतो. यामुळे त्यांना दमा, कान दुखणे, न्यूमोनिया आणि श्वसनाचे आजार होण्याचा धोका वाढतो.
अर्भकांसाठी धोकादायक : धूम्रपान करणाऱ्या पालकांसोबत राहणाऱ्या बाळांना सडन इन्फंट डेथ सिंड्रोम (SIDS) म्हणजेच अचानक मृत्यूचा धोका जास्त असतो.
श्वसनाचे आजार : फक्त कॅन्सरच नव्हे, तर ब्रॉन्कायटिस, श्वसनाचा त्रास यांसारखे दीर्घकालीन आजारसुद्धा होऊ शकतात.
मृत्यूची शक्यता : जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, दरवर्षी जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू पॅसिव्ह स्मोकिंगमुळे होतो. यावरून हे स्पष्ट होते की याचा कोणताही सुरक्षित स्तर नाही.
पॅसिव्ह स्मोकिंगपासून बचाव कसा कराल?
1.धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींपासून शक्य तितके दूर राहा.
2.लहान मुलं आणि बाळांसमोर कधीही धूम्रपान करू नका.
3.सार्वजनिक ठिकाणी नो स्मोकिंग नियमांचे पालन करा आणि इतरांनाही ते पाळण्यास प्रवृत्त करा.
4.घरात किंवा वाहनात धूम्रपानास परवानगी देऊ नका.
धूम्रपान न करताही पॅसिव्ह स्मोकिंगमुळे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे स्वतःच नाही तर आपल्या कुटुंबासाठीही यापासून सावध राहणे अत्यावश्यक आहे.
(टीप : वरील माहिती सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. याची My Mahanagar पुष्टी करत नाही. वाचकांनी कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Comments are closed.