Shila Dawre: भारतातील पहिल्या महिला रिक्षाचालक शीला डावरे

ते वर्ष होतं 1989 चं. एक तरुणी रिक्षा परमिटसाठी पुण्याच्या आरटीओचे उंबरठे झिजवत होती. मात्र, दाढी-मिशा नसणाऱ्यांना परमिट देत नाही, असं सांगून पुरुषी मानसिकतेचे अधिकारी आणि कर्मचारी तरुणीला परमिट नाकारत होते. अखेर एक दिवस तत्कालीन परिवहन मंत्री विलासराव देशमुख पुण्यात आले असताना ही तरुणी थेट विलासरावांना भिडली. परमिट मिळेपर्यंत कार्यक्रमाच्या जागेवरून हलणार नाही, असा निर्धार केला. विलासरावांनी त्यांची बाजू समजून घेतली आणि काय आश्चर्य महिनाभरात म्हणजे डिसेंबर 1989 मध्ये त्यांच्या घरी पोस्टाने परमिट आले. त्या तरुणीचे नाव होते शीला डावरे. होय, त्याच ज्यांनी देशातील पहिल्या रिक्षाचालक होण्याचा मान मिळवला. ( India’s First Female Rickshaw Driver )

खरं पाहता शीला डावरे मूळच्या परभणीच्या. मात्र, त्यांनी संघर्ष पुण्यात केला. याचीही एक गोष्ट आहे. लहानपणापासून त्यांना गाड्यांचं आकर्षण होतं. म्हणून त्यांनी 18 व्या वर्षी ड्रायव्हिंग लायसन्स काढलं होतं. त्या मित्रांची गाडी चालवायच्या. अशीच संधी त्यांना रिक्षा चालवण्याचीही मिळाली होती. ते वर्ष होतं 1988. म्हणजे 37 वर्षांपूर्वीची गोष्ट. त्याकाळात मुलींनी गाड्या चालवणं आणि तेही परभणीसारख्या ठिकाणी म्हणजे समाज काय म्हणेल, अशीच स्थिती होती. त्यामुळे शीला डावरे यांच्या ड्रायव्हिंगच्या आवडीविरोधात अनेकांनी त्यांच्या आईवडिलांकडे तक्रारी केल्या. यावरून शीला डावरे यांच्या घरात मोठा वाद झाला. आईवडिलांनी गाडी चालवण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या शीला डावरे रागारागानं घरबाहेर पडल्या आणि थेट परभणी रेल्वे स्टेशन गाठलं.

शीला डावरे यांनी घर सोडलं तेव्हा त्या 18 वर्षांच्या होत्या. पुढे काय करायचं माहीत नाही आणि खिशात केवळ 12 रुपये होते. तरीही त्या पुणे ट्रेनमध्ये बसल्या. पुढे जे व्हायचं तेच झालं. टीसीनं त्यांना पकडलं. मात्र, त्यांच्याकडे दंड भरण्यासाठीही पैसे नव्हते. त्यामुळे टीसीनं त्यांना ट्रेनमध्ये फिरवले आणि ‘तुला जेलमध्ये टाकू’ अशी धमकी दिली. त्यावर ‘टाका, तेवढंच मला पुढं काय करायचं याचा विचार करायला वेळ मिळेल’ असं उत्तर त्यांनी दिलं. त्यानंतर त्या टीसीनं शीला यांना पुण्यात उतरवलं शिवाय खर्चासाठी 150 रुपये दिले.

पुणं गाठलं आणि इथूनच शीला डावरे यांचा खडतर प्रवास सुरू झाला. घर सोडलेलं असल्यामुळे आणि सोबत फारसे पैसे नसल्याने यातून मार्ग काढत त्यांनी भाड्याने रिक्षा चालवायला घेतली आणि 1988 मध्येच त्या भारतातील पहिल्या महिला रिक्षाचालक ठरल्या. पण, रिक्षाचालक होण्याचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. पुण्यात काही दिवस नातेवाईकांकडे त्या राहिल्या. या काळात त्यांनी काही संघटनांशी पत्रव्यवहार केले आणि रिक्षा भाड्याने मिळवण्याचा प्रयत्न केला. यामध्येही त्यांना अनेक अडचणी आल्या. कारण मुलगी रिक्षा चालवू शकते यावर कुणीच विश्वास ठेवायला तयार नव्हते. अखेर त्यांना रिक्षा भाड्याने मिळाली आणि त्यांनी स्वप्न पूर्ण करण्याची पहिली पायरी यशस्वीपणे पार केली.

शीला यांचा रिक्षाचालक म्हणून प्रवास सुरू झाला. मात्र, एक महिला रिक्षाचालक स्वीकारणे लोकांना जड गेले. अनेकदा प्रवासी त्यांच्या रिक्षेत बसायचे आणि मध्येच उतरून जायचे. या काळात रात्री एका गॅरेजमध्ये त्या रिक्षा उभी करून रिक्षेतच झोपायच्या. सुरक्षेसाठी खिशात कायम लाल तिखट आणि विष ठेवायच्या. एक पाव दोन-दिवस खाऊन त्यांनी दिवस काढले.

रिक्षाचे परमिट मिळवण्यासाठी शीला यांना अनेक अडचणी आल्या. आरटीओमध्ये पुरुषी मानसिकता दिसून आली. फक्त पुरुषच रिक्षा चालवतात, यावर ते ठाम होते. त्यामुळे परमिट देण्यास नकारघंटा वाजवत होते. त्यावर निराश न होता थेट तत्कालीन परिवहन मंत्री विलासराव देशमुख यांना अडवले आणि महिनभरात त्यांना परमिट मिळाले. त्यांनी 12-13 वर्षे रिक्षा चालवली. महिला रिक्षा चालवू शकते, हे दाखवून दिलं. हळूहळू पुण्यातील एक महिला रिक्षा चालवते, ही माहिती पसरली. त्याचं सर्वांना कौतुक वाटलं. 2016 मध्ये महिलांसाठीच्या पिंक ऑटोसाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या कामाचे अनेक ठिकाणी कौतुक झाले. त्यांना भारताचा फर्स्ट लेडी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌सने त्यांच्या कामाची दखल घेतली. 2018 मध्ये त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Comments are closed.