Trisha Thosar: अवघ्या चौथ्या वर्षी रचला इतिहास, राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारी त्रिशा ठोसर कोण?

७१वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये सर्वाधिक चर्चा रंगली ती अवघ्या चार वर्षांच्या त्रिशा ठोसर नावाच्या चिमुरडीची. जेव्हा ती पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर आली तेव्हा सर्वांचा चेहरा खुलला होता. कारण पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्रिशा साडी नेसून आली होती.

मराठी चित्रपट सृष्टीतील चार बालकलाकारांना यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारात सन्मानित करण्यात आले. ‘नाळ २’ चित्रपटासाठी श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप तर ‘जिप्सी’ चित्रपटासाठी कबीर खांडारे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला. या सर्वांच्यात त्रिशा ही सर्वात लहान असल्याने सोहळ्याला उपस्थित सर्वांचे तिने लक्ष वेधून घेतले.

कोण आहे त्रिशा ठोसर?
वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावे करून त्रिशाने इतिहास रचला आहे. त्रिशाने नाळ २ चित्रपटात चिमीची भूमिका साकारली होती. त्रिशा ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय बालकलाकार आहे. तिने काही चित्रपट, जाहिराती आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे. तसेच ‘मानवत मर्डर्स’, ‘पेट पुराण’ या वेब सीरिजमध्येही त्रिशा झळकली आहे. तसेच त्रिशाने नुकतेच अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटात काम केले होते. आता महेश मांजरेकरांच्या आगामी ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ मराठी चित्रपटात त्रिशा महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

Comments are closed.