लांबच्या विमान प्रवासादरम्यान पायलट कशी झोप काढतात?
विमान प्रवास आज अनेकांसाठी सर्वात सोयीस्कर पर्याय बनला आहे. विशेषतः लांबच्या प्रवासात शेकडो प्रवासी निर्धास्त झोप घेतात. पण, प्रश्न असा पडतो की एवढ्या मोठ्या जबाबदारीच्या प्रवासात पायलटला झोप येते का? त्यांना झोप घ्यायची परवानगी असते का? (can pilot sleep during long flights)
अमेरिकेत बंदी, पण युरोप-आशियात परवानगी
प्रत्येक देशातील विमान वाहतूक नियम वेगवेगळे आहेत. अमेरिकेत FAA (फेडरल एविएशन अॅडमिनिस्ट्रेशन) च्या नियमानुसार पायलटला उड्डाणादरम्यान झोप घेण्यास सक्त मनाई आहे. अगदी डुलकी घेणेसुद्धा नियमभंग मानलं जातं. तर युरोप आणि आशियातील अनेक विमान कंपन्यांमध्ये मात्र ‘कंट्रोल्ड रेस्ट’ या प्रणालीखाली थोड्या वेळासाठी झोप घेण्याची परवानगी दिली जाते.
कंट्रोल्ड रेस्ट म्हणजे काय?
लांब प्रवासादरम्यान कॉकपिटमध्ये किमान दोन वैमानिक असतात कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसर. त्यापैकी एक सतत जागा आणि नियंत्रणात असतो, तर दुसऱ्याला 20 ते 40 मिनिटांची डुलकी घेण्याची परवानगी असते. यालाच कंट्रोल्ड रेस्ट किंवा पॉवर नॅप म्हणतात. यामुळे पायलटला ताजेतवाने वाटतं आणि उड्डाणातील एकाग्रता वाढते.
ऑटोपायलट आणि ATC वर अवलंबून
जेव्हा पायलट विश्रांती घेतो तेव्हा ऑटोपायलट प्रणाली सक्रिय असते. सोबत दुसरा वैमानिक नियंत्रणात असतो आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला याबाबत माहितीही दिली जाते. त्यामुळे प्रवास सुरक्षितपणे चालू राहतो.
शिफ्टमध्ये घेतली जाते विश्रांती
युरोप, अमेरिका किंवा आशियामधील लांब प्रवास करणाऱ्या मोठ्या विमानांमध्ये साधारणपणे 3 ते 4 पायलट असतात. हे पायलट शिफ्टनुसार काम करतात. काही मोठ्या विमानांमध्ये तर पायलटसाठी वेगळे झोपेचे कक्ष (Resting Cabin)ही असतात.
पायलटला झोप घेणं का आवश्यक?
लांबच्या प्रवासात थकवा येणं स्वाभाविक आहे. थकलेल्या अवस्थेत निर्णय क्षमता, निरीक्षण आणि स्मरणशक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे थोडी डुलकी घेतल्याने पायलट पुन्हा ताजेतवाने होतो आणि उड्डाण अधिक सुरक्षित बनतं.
Comments are closed.