ब्लड टेस्ट करायला जाताय? मग या गोष्टी माहित असणे गरजेचे

अनेकदा आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्लड टेस्ट करतो. या रक्ताच्या चाचणीमुळे आजार किंवा संसर्गाचे निदान होते. ज्यामुळे योग्य उपचार घेण्यास मदत होते. रक्त तपासणीमुळे रक्त संक्रमण, रक्तातील ग्लुकोजची पातळी, लाल आणि पांढऱ्या रक्त पेशींची संख्या, प्लेटलेट संख्या आणि प्लाझ्मा पातळीची अचूक माहिती मिळते. रक्त तपासणी करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहित असणे गरजेचे आहे. कारण बहुतेकदा रक्त तपासणी करताना आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.

रिकाम्या पोटीच ब्लड टेस्ट करावी का?
अनेकदा असे म्हंटले जाते की रिकाम्या पोटीच ब्लड टेस्ट करावी मात्र यामध्ये कितपत तथ्य आहे हे जाणून घेऊया… तर तज्ञांच्या मते, रक्त चाचण्या, जसे की शुगर, लिपिड प्रोफाइल किंवा थायरॉईड या रिकाम्या पोटीच करणे बंधनकारक असते. या ब्लड टेस्ट करण्यापूर्वी ८ ते १२ तास काहीही खाऊ नये. या काळात पाणी पिल्यास हरकत नाही. मात्र चहा, कॉफी, ज्यूस घेतल्यास देखील योग्य निदान होत नाही.

औषध
रक्त तपासणी करण्यापूर्वी, कोणतीही औषधे घेत असाल तर डॉक्टरांना कळवणे गरजेचे आहे. जसे की, तुम्ही जर रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयरोगाची नियमित औषधे घेऊन ब्लड टेस्ट करणार असाल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

व्यायाम टाळा
जर तुमच्या रक्तातील साखर किंवा कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असेल, तर रक्त तपासणीपूर्वी जास्त व्यायाम करणे किंवा चालणे टाळा. यामुळे रक्तातील साखर किंवा कोलेस्ट्रॉलची पातळी कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे रक्त चाचणीपूर्वी किमान २४ तास व्यायाम करू नये.

पुरेशी झोप
रक्त तपासणीपूर्वी पुरेशी झोप घेणे देखील महत्त्वाचे आहे. झोपेच्या अभावामुळे हार्मोन्स आणि साखरेच्या पातळीवर परिणाम होतो, ज्यामुळे चुकीचे निदान होऊ शकते.

मद्यपान आणि धूम्रपान
रक्त तपासणी करण्यापूर्वी किमान २४ तास आधी मद्यपान किंवा धूम्रपान टाळावे. यामुळे लिपिड प्रोफाइल आणि रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो.

Comments are closed.