Chanting: नामस्मरणाचा आयुष्यावर काय परिणाम होतो?

हिंदू धर्मात नामस्मरणाला अत्यंत महत्त्व दिलं गेलं आहे. आजच्या ताणतणावाच्या जीवनातही अनेकांना शांतता आणि स्थैर्य हवं असतं, पण त्यासाठी कोणती दिशा घ्यायची हे कळत नाही. याच प्रश्नाचं उत्तर धर्मअभ्यासक आणि ज्योतिषी नरेंद धारणे गुरुजी यांनी ‘ओन्ली मानिनी’ ला दिलेल्या मुलाखतीत दिलं. (namasmaran positive effect on life in marathi)

त्यांना विचारण्यात आलं, “नामस्मरणाचं आपल्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो?” त्यावर त्यांनी अतिशय सोप्या आणि पटेल अशा शब्दांत सांगितलं “नामस्मरणाने मन, बुद्धी आणि आत्मा या तिन्ही पातळ्यांवर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.”

नामस्मरणाचं खरं महत्त्व
धारणे गुरुजी सांगतात की कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्णानेही गीतेमध्ये ‘नामस्मरण’ हे सर्वश्रेष्ठ साधन असल्याचं सांगितलं आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी यांसारख्या अनेक संत परंपरांनी नामस्मरणाचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. गुरुजी म्हणतात, “आपल्याकडे तीन प्रकारचे दैवत असतात इष्टदैवत, उपास्यदैवत आणि कुलदैवत. ज्याच्यावर श्रद्धा असेल, त्या दैवताचं नामस्मरण करावं. स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा कोणतंही असो, श्रद्धेने घेतलेलं नामस्मरण मनाला शांती आणि आत्मशक्ती देतं.”

पूर्ण व्हिडिओ पहा:

https://www.youtube.com/watch?v=2xlvptar-bu'

मानसिक आणि आध्यात्मिक परिणाम
नित्य नामस्मरणामुळे मन शांत राहतं, आत्मविश्वास वाढतो, आणि आयुष्य अधिक संतुलित होतं. धारणे गुरुजी सांगतात की, “जेव्हा मनातील नकारात्मक विचार कमी होतात, तेव्हा निर्णय क्षमता वाढते आणि जीवनात सकारात्मकतेचा प्रकाश निर्माण होतो.”

आजच्या काळात अनेक लोक ध्यान, योग, मेडिटेशन यांचा शोध घेत आहेत, पण आपल्या संत परंपरेनं सांगितलेलं ‘नामस्मरण’ हेच सर्वोत्तम साधन आहे. श्रद्धेने घेतलेलं एक साधं नामस्मरणही आयुष्याचा दृष्टिकोन बदलू शकतं.

Comments are closed.