मासिक पाळी नियमित तर सगळे आजार दूर, स्त्रीरोगतज्ञांचा इशारा
स्त्रीच्या आरोग्याचा पाया तिच्या मासिक पाळीत दडलेला आहे. पाळी हा केवळ नैसर्गिक जैविक प्रक्रिया नसून स्त्रीच्या संपूर्ण आरोग्याचं प्रतिबिंब आहे. सुप्रसिद्ध आयुर्वेदिक स्त्रीरोगतज्ञ प्रज्ञा आपटीकर यांनी ‘मानिनी’ला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले की, नियमित मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीरासाठी कवचासारखी आहे, कारण ती केवळ प्रजनन प्रणालीच नव्हे तर शरीरातील हार्मोनल समतोल आणि रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवते. (regular menstrual cycle ayurveda womens health)
त्यांच्या मते, ज्या महिलांची मासिक पाळी नियमित असते, त्या महिलांना बहुतेक आरोग्यसमस्या टाळता येतात. नियमित पाळी म्हणजे शरीरात हार्मोन्स इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन यांचा संतुलित प्रवाह सुरू असतो. या संप्रेरकांमुळे स्त्रीचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही स्थिर राहतात. पाळी अनियमित झाली की शरीरात या संप्रेरकांचा ताळमेळ बिघडतो आणि त्याचा परिणाम थकवा, वजन वाढणं, केसगळती, मूड स्विंग, त्वचेच्या समस्या, तसेच पीसीओडी, थायरॉईड, अनिद्रा अशा अनेक आजारांवर होतो.
आयुर्वेदात सांगितले आहे की पाळी नियमित ठेवणं म्हणजे शरीराचा समतोल राखणं. कारण मासिक पाळी ही शरीरातून अपानवायूच्या माध्यमातून होणारी नैसर्गिक शुद्धी प्रक्रिया आहे. जेव्हा ही प्रक्रिया योग्य पद्धतीने होते, तेव्हा शरीरातील दोष संतुलित राहतात आणि रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनिटी) मजबूत राहते.
पण अनेक स्त्रिया आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तणाव, झोपेचा अभाव, चुकीचा आहार, आणि हार्मोनल असंतुलन यामुळे पाळीवर परिणाम होतो. या सगळ्या कारणांचा थेट संबंध शरीराच्या एकूण कार्यक्षमतेशी असतो. त्यामुळे पाळी अनियमित होणं ही केवळ ‘सामान्य गोष्ट’ नसून ती शरीरातील मोठ्या असंतुलनाची पहिली सूचना असते.
पूर्ण व्हिडिओ पहा:
https://www.youtube.com/watch?v=ffqgbqeim9g
आयुर्वेदानुसार, नियमित दिनचर्या, योग्य आहार, पुरेशी झोप आणि मानसिक शांतता या गोष्टी पाळीला नियमित ठेवतात. यासोबत पंचकर्म आणि औषधी उपचार देखील शरीरशुद्धीमध्ये मदत करतात. पाळीच्या काळात विश्रांती, हलकं अन्न आणि ताणमुक्त मन या गोष्टी आरोग्य टिकवण्यासाठी महत्त्वाच्या आहेत.
स्त्रियांनी स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष न करता त्याचं निरीक्षण करायला शिकलं पाहिजे. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून तिचं नियमित असणं म्हणजे आरोग्याचं लक्षण आहे. पाळीची काळजी म्हणजे स्वतःची काळजी कारण नियमित मासिक पाळी हेच स्त्रीच्या आरोग्याचं खरं रक्षणकवच आहे.
Comments are closed.