Diwali 2025: मुंबईतील सर्वात जुनी कंदील गल्ली आणि कलाकारांची तयारी

दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा सण, आनंदाचा क्षण आणि रंगीबेरंगी कंदिलांच्या झगमगाटाशिवाय हा सण अपूर्णच. मुंबईतील माहीम परिसरात अशी एक गल्ली आहे, जी या सणाचं खास वैशिष्ट्य बनली आहे माहीम कंदील गल्ली. येथे प्रत्येक वर्षी दिवाळीच्या काही आठवडे आधीच कंदिलांची दुनिया उजळून निघते. (mumbai mahim kandil galli artists making traditional- anterns diwali 2025)

या गल्लीतील कलाकार हेच दिवाळीच्या सजावटीमागचं खरं सौंदर्य आहेत. त्यांच्या हातांनी तयार होणारे कागदी, बांबूपासून बनवलेले आणि विविध डिझाईनचे कंदील बाजारात झळकतात. काहींची ही कला पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे, तर काही तरुण मुलं आणि विद्यार्थीदेखील आता ह्या परंपरेत सहभागी होत आहेत.

एका महिला कलाकाराने सांगितलं, “मी सुरुवात केली तेव्हा फक्त घरासाठी बनवलेले कंदील विकले. लोकांना आवडले, मग हा माझा छोटासा व्यवसाय बनला. आता 15 वर्षं झालीत.” त्या पुढे म्हणाल्या, “कागदी कंदील हे पर्यावरणपूरक असतात. प्लास्टिकचे कंदील दिसायला आकर्षक असले तरी निसर्गाला हानिकारक आहेत. त्यामुळे ही पारंपरिक कंदील संस्कृती टिकून राहावी, हीच इच्छा आहे.”

केवळ मोठ्या व्यक्तीच नव्हे तर अनेक तरुण आणि विद्यार्थीही या कंदील बनवण्याच्या प्रक्रियेत भाग घेत आहेत. एका विद्यार्थिनीने सांगितले, “मी कॉलेजमध्ये शिकते आणि त्यासोबत हे पार्ट टाईम काम करते. मला क्रिएटिव्ह वर्क आवडतं, म्हणून मी हे करते. स्वतः पैसे कमवण्याचा आनंद आणि आपली कला दाखवण्याची संधी दोन्ही मिळते.” तर एका तरुणाने सांगितले, “मी दिवसभर जॉब करतो आणि दुपारनंतर इथे येऊन कंदील बनवतो. थकवा येतो पण समाधानही मिळतं.”

https://www.youtube.com/watch?v=hpaldhuub6i

माहीम कंदील गल्लीतील प्रत्येक घर दिवाळीच्या काही दिवस आधीच कार्यशाळा बनतं. हातात कात्री, गोंद, रंगीत कागद, बांबू आणि दिवे या सगळ्यांनी एक रंगीबेरंगी सृजन सुरू होतं. छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सगळे एकत्र बसून काम करतात. काही कंदील 25 रुपयांना मिळतात, तर मोठे आकर्षक कंदील 200-400 रुपयांपर्यंत जातात.

या गल्लीतील सर्व कलाकारांचं एकच मत “हा मराठी माणसाचा व्यवसाय आहे व्यवसायासोबतच ही मराठी संस्कृती पुढे गेलीच पाहिजे.” आजीपासून नातवंडांपर्यंत

कंदील बनवण्याची ही कला आणि परंपरा सुरू आहे. त्यांच्यामते, “ही फक्त कमाई नाही, ही संस्कृती आहे.”दिवाळीच्या रोषणाईत चमकणारे हे कंदील केवळ सजावटीचा भाग नाहीत, तर हजारो कुटुंबांच्या परिश्रमाचा, अभिमानाचा आणि संस्कृतीचा उजेड आहेत.

Comments are closed.