ब्राऊन की पांढरी अंडी? रंगाचा गोंधळ सोडा, खरा फरक जाणून घ्या
अंडी म्हणजे निसर्गाने दिलेलं एक परिपूर्ण अन्न. नाश्ता असो वा जिमनंतरचा प्रोटीन सोर्स अंड्याला पर्याय नाही. एका मोठ्या अंड्यात सुमारे 6 ते 7 ग्रॅम प्रोटीन, व्हिटॅमिन A, D, E, B12 तसेच चोलिन, ल्यूटीन, झीअॅक्सँथिन आणि चांगले फॅट्स असतात. पण अनेकदा प्रश्न पडतो ब्राऊन अंडी जास्त पौष्टिक असतात की पांढरी? (brown vs white eggs nutrition difference in marathi)
अंड्याचा रंग का बदलतो?
बहुतांश लोकांना वाटतं की ब्राऊन अंडी म्हणजे ‘हेल्दी’ आणि पांढरी म्हणजे ‘साधी’. पण ही कल्पना चुकीची आहे. अंड्याचा रंग हा त्याच्या कोंबडीच्या जातीवर अवलंबून असतो, पौष्टिकतेवर नाही. पांढरी पिसं आणि हलक्या रंगाचे कान असलेल्या कोंबड्या पांढरी अंडी घालतात, तर लालसर पिसं आणि गडद कान असलेल्या कोंबड्या ब्राऊन अंडी घालतात. अंड्याच्या कवचावर ‘प्रोटोपोर्फिरिन’ नावाचं नैसर्गिक रंगद्रव्य साचतं आणि त्यामुळे कवचाचा रंग बदलतो.
अंड्याच्या आतली झिल्ली (Eggshell Membrane अंड्याच्या कवचाच्या आत असलेला पडदा)) मात्र दोन्ही प्रकारांत पांढरीच असते.
पोषणाच्या दृष्टीने फरक आहे का?
नाही. वैज्ञानिक अभ्यासानुसार ब्राऊन आणि पांढरी अंडी दोन्हीमध्ये प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांचं प्रमाण जवळपास सारखंच असतं.कधी कधी ब्राऊन अंडी वजनाने थोडी जड वाटतात, पण त्याने पोषणात फारसा फरक पडत नाही. कोंबडीला मिळणारं अन्न, तिचं आरोग्य आणि ती ज्या वातावरणात वाढते ते घटक अंड्याच्या गुणवत्तेवर परिणाम करतात रंगावर नाही.
कोणती अंडी निवडावीत?
अंड्याचा रंग न पाहता खालील गोष्टींवर लक्ष द्या:
1) कोंबड्या कशा पद्धतीने पाळल्या जातात:
‘फ्री-रेंज’, ‘पॅस्टर-रेज्ड’ किंवा ‘ऑर्गेनिक’ अशी लेबल असलेली अंडी अधिक चांगली मानली जातात, कारण अशा कोंबड्यांना नैसर्गिक प्रकाश, चांगलं अन्न आणि मोकळं वातावरण मिळतं.
2) ताजेपणा सर्वात महत्त्वाचा:
अंडं जितकं ताजं, तितका त्याचा स्वाद आणि पोत अधिक चांगला.
3) आहारानुसार अंडी:
काही अंडी ‘ओमेगा-३ एग्स’ म्हणून विकली जातात. त्यातील पौष्टिकता कोंबडीच्या आहारातून येते, कवचाच्या रंगातून नाही.
3) किंमतीकडे लक्ष द्या:
फक्त रंगावरून किंमत जास्त ठेवली असेल, तर तो बहुधा मार्केटिंगचा भाग असतो.
ब्राऊन आणि पांढरी अंडी दोन्ही पौष्टिक, दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर. फरक फक्त कवचाच्या रंगाचा आहे. म्हणून पुढच्या वेळी बाजारात अंडी घेताना रंगाऐवजी ताजेपणा आणि स्त्रोतावर लक्ष द्या.
आरोग्यासाठी कोणतं अंडं चांगलं हे ठरवताना रंगावर नाही, तर गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा. कारण शेवटी महत्वाचं आहे ते अंड्यातलं पोषण, बाहेरचं कवच नव्हे.
Comments are closed.