Importance of Abhyanga snan : नरकचतुर्दशीला अभ्यंग स्नान का करतात? जाणून घ्या योग्य विधी
आनंदाचा, उत्साहाचा आणि रोषणाईचा सण म्हणजे दिवाळी. हा पाच दिवसांचा सण असतो. या सणाच्या दिवसातील धनत्रयोदशीनंतर येणाऱ्या नरक चतुर्दशीला विशेष महत्व आहे. या दिवसाला यम चतुर्दशी असेही म्हणतात. या दिवशी यमाची पूजा करण्याची आणि पहाटे विशेष स्नान करण्याची प्राचीन परंपरा आहे. ज्याला ‘अभ्यंगस्नान’ असे म्हणतात. चला तर नरक चतुर्दशीच्या निमित्ताने जाणून घेऊ ‘अभ्यंगस्नान’ म्हणजे नेमके काय आणि त्याचे महत्व. (Importance of Abhyanga snan In Diwali Narakchaturdashi)
अभ्यंग म्हणजे मालिश आणि लेपण. प्रचलित प्रथेनुसार, नरक चतुर्दशीदिवशी कोमट तिळाचे तेल संपूर्ण शरीराला लावून मालिश केली जाते. त्यानंतर सुगंधी उटणे लावले जाते आणि अपामार्ग नावाची एक औषधी वनस्पती डोक्याभोवती तीन वेळा फिरवली जाते.
पौराणिक कथेनुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशी दिवशी श्रीकृष्ण आणि देवी सत्यभामा यांनी नरकासुराचा वध केला होता. राक्षसाचा वध केल्यानंतर त्यांनी अभ्यंगस्नान करून शरीर आणि मन शुद्ध केले होते. तेव्हापासून ही अभ्यंग स्नानाची परंपरा सुरू झाली. असे मानले जाते, अभ्यंगस्नानामुळे अकाली मृत्यूचे भय नाहीसे होते. शिवाय मृत्यूनंतर नरक यातना सहन कराव्या लागत नाहीत.
स्कंदपुराणात अभ्यंगस्नान करण्याचा विधी सांगण्यात आला आहे. त्यानुसार, पहाटे 4.30 ते 6 या ब्रह्ममुहुर्तात हे स्नान केले जाते. छान रांगोळीच्या मध्यभागी ठेवलेल्या पाटावर व्यक्तीला बसवावे. त्याचे औक्षण करावे. यावेळी पाटावर बसलेल्या व्यक्तीने मनोमन संकल्प करावा. यानंतर तिळाचे तेल कोमट करून आधी डोकं मग मान, खांदे, पाठ, पोट, हाथ आणि शेवटी पायाला व्यवस्थित मालिश करावी. पुढे बेसन, हळद, कच्चे दूध, लिंबाचा रस मिसळून घरगुती उटणे तयार करावे किंवा आयुर्वेदिक सुगंधी उटणे वापरावे. उटण्याची पाच बोटे जमिनीवर डावीकडे आणि उजवीकडे लावून घ्यावी. यानंतर पाटावर बसलेल्या व्यक्तीच्या संपूर्ण अंगाला उटणे लावावे. शेवटी कोमट पाण्याने अंघोळ करावी आणि डाव्या पायाच्या अंगठ्याने कारीट फोडावे. नवे किंवा स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करून देवाला नमस्कार करावा.
हेही वाचा –
Diwali : नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी कारिट पायाने का फोडायचे असते?
Comments are closed.