दिवाळीत फटाके फोडताना भाजलात? घाबरू नका, घरच्या घरी करा हे सोपे प्रथमोपचार

दिवाळी म्हटलं की रोषणाई, फराळ, रांगोळी आणि फटाके हे आलंच. त्याचबरोबर या उत्सवातील सर्वात आकर्षक भाग फटाके अनेकदा आनंदाऐवजी त्रासाचं कारण ठरतात. फटाके फोडताना थोडीशी चूक झाली तरी हात, चेहरा किंवा पाय भाजण्याची शक्यता असते. अशा वेळी योग्य वेळी केलेले प्रथमोपचार (First Aid) तुमचं मोठं नुकसान टाळू शकतात. (diwali firecracker burns first aid tips)

दरवर्षी दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे लहान-मोठ्या भाजण्याच्या घटना घडतात. काही जण घाबरून चुकीचे उपाय करतात, जसे की भाजलेल्या भागावर थेट बर्फ, टूथपेस्ट किंवा हळद लावणं. पण हे उपाय उलट त्रास वाढवतात. अशावेळी नेमकं काय करायचं हे जाणून घेणं गरजेचं आहे.

फटाके फोडताना काळजी घ्या
– लहान मुलांच्या हातात कधीही जळते फटाके देऊ नका.
– फटाके नेहमी मोकळ्या जागेत आणि वाऱ्याच्या दिशेपासून दूर फोडा.
– फटाका विझला तरी त्वरित हात लावू नका थोडा वेळ थांबा.
– पाण्याची बादली जवळ ठेवा, जेणेकरून आपत्कालीन प्रसंगी ती उपयोगी पडेल.

भाजल्यावर त्वरित करावेत हे प्रथोमोपचार:

१. भाजलेल्या जागेवर थंड पाणी ओता
फटाक्यामुळे भाजल्यास लगेच त्या जागी थंड (पण बर्फासारखं नाही) पाणी ओता. यामुळे त्वचेतील उष्णता कमी होते आणि वेदना कमी जाणवतात. मात्र, थेट बर्फ लावू नका कारण त्यामुळे त्वचेतील रक्तप्रवाह बिघडू शकतो.

२. कोरफड लावा
कोरफड हा नैसर्गिक उपाय आहे जो त्वचेचा दाह कमी करून आराम देतो. घरच्या कोरफडीचा गर काढून भाजलेल्या जागी लावल्यास फोड येणं टाळता येतं आणि त्वचा थंड राहते.

३. नारळाचे तेल वापरा
भाजलेली जागा कोरडी होऊ नये म्हणून त्यावर नारळाचं तेल हलक्या हाताने लावा. हे तेल त्वचेचं संरक्षण करतं आणि दाह कमी करतं.

४. घट्ट कपडे काढा
भाजलेल्या भागावर घट्ट कपडे किंवा दागिने असल्यास ते त्वरित काढा. जळजळीत त्वचेवर ते चिकटल्यास संसर्ग होऊ शकतो.

५. टूथपेस्ट आणि हळद लावू नका
बर्‍याचजणांना वाटतं टूथपेस्ट किंवा हळद लावल्याने आराम मिळतो, पण हे चुकीचं आहे. टूथपेस्टमधील रसायनं त्वचेला त्रास देतात आणि संसर्गाचा धोका वाढवतात.

भाजणं गंभीर असल्यास काय करावं?
जर भाजलेली जागा मोठी असेल, फोड आले असतील, किंवा चेहरा व डोळ्याजवळ भाजले असेल, तर ताबडतोब जवळच्या रुग्णालयात जा. वेळेवर उपचार मिळाल्यास मोठं नुकसान टाळता येतं.

Comments are closed.