Parenting Tips: बाळाला जास्त दूध पाजणेही ठरते घातक; जाणून घ्या तज्ञांचे मत
दूध हे आरोग्यासाठी एक सुपरफूड मानले जाते. बऱ्याचदा आई- वडील त्यांच्या लहान मुलांना आणि बाळांना सतत दूध देत असतात. जेव्हा एखादे मूल जेवायला नाही म्हणते तेव्हा हमखास पालक त्याला दूध देतात, पालकांचा असा समज असतो की दुधाने मुलाचे पोट भरते. पण तज्ञांच्या मते, जास्त दूध देणे देखील लहान मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे लहानपणीच अनेक आरोग्य समस्या उद्भवतात.
बहुतेकदा लहान मुलं जेवायला नाही म्हणतात, तेव्हा त्यांना एक ग्लास दूध दिले जाते. पण सतत दूध दिल्याने मुलांच्या शरीरात लोहाची कमतरता, अशक्तपणा जाणवतो. शिवाय त्यांची वाढ योग्यरीत्या होत नाही. कारण दुधाने मुलांचे पोट भरते, मग ते अन्न घेत नाहीत. परिणामी शरीराला लोह, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे आवश्यक पोषक घटक पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत.
मुलांना किती दूध द्यावे?
मूल एक वर्षाचे झाले की त्याला जास्त दुधाची गरज नसते. एक वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना दररोज सुमारे ५०० मिली (अर्धा लिटर) दूध पुरेसे असते. यापेक्षा जास्त दूध दिल्याने मुलांचा आहार कमी होतो. दूध हे कॅल्शियम आणि प्रथिनचा चांगला स्रोत आहे, पण डाळी, भाज्या, फळे आणि ड्रायफ्रूट यांसारखे पदार्थ देखील मुलांच्या वाढीसाठी आवश्यक ठरतात.
जर मुलांना जास्त दूध पिण्याची सवय असेल तर पालकांनी मुलांना हळूहळू कमी दूध देणे सुरू करावे. बाळ ६ महिन्यांचे झाल्यावर त्याला हळूहळू अन्न द्यावे. मुलांच्या शरीराला केवळ कॅल्शियमच नाही तर लोह, जस्त, जीवनसत्त्वे आणि फायबरची देखील आवश्यकता असते. हे सर्व पोषक घटक केवळ दुधाने नव्हे तर योग्य आहारामुळे मिळतात.
Comments are closed.