मुलं माती, खडूसारख्या गोष्टी का खातात? तज्ज्ञांनी सांगितले यामागील कारण
अनेकदा लहान मुलांमध्ये माती, खडूसारख्या गोष्टी खाण्याची सवय दिसून येते. अगदी पाटीवरची पेन्सिल, पेपर, साबण, भिंत चाटणे, खेळणी तोंडात घालणे अशा गोष्टी लहान मुले करताना दिसतात. लहान वयात काय योग्य हे माहीत नसल्याने मुलांकडून नकळत या गोष्टी घडतात. पण, अनेकदा मुलं चार ते पाच वर्षाचे होईपर्यंत या सवयी आढळून येतात. पण, यामागचे कारण काय असेल? याचा विचार कधी केलात का? लहान मुले माती, खडूसारख्या गोष्टी का खातात? चला जाणून घेऊयाच बालरोगतज्ज्ञ याविषयी काय सांगतात.
असू शकतो आजार –
मुलं माती, खडू खात असतील तर या सवयीला ‘पाईका’ (Pica) असं म्हणतात. तज्ज्ञांच्या मते अशा मुलांच्या शरीरात लोहाची कमतरता असते तसेच पोटात जंत असण्याची शक्यता असते. अनेकदा मानसिक तणावामुळे मुले अशा गोष्टी करतात. जेव्हा पालकांचे दुर्लक्ष होते आणि लक्ष वेधून घेण्यासाठी मुलांकडून अशा गोष्टी घडतात. त्यामुळे पालकांनी मुलांकडे लक्ष द्यायला हवं.
हेही वाचा – Parenting Tips: बाळाला जास्त दूध पाजणेही ठरते घातक; जाणून घ्या तज्ञांचे मत
पाईका आजार –
पाईका हा खाण्याचा आजार आहे. या आजारात मुलं अशा गोष्टी खातात ज्या खाण्यायोग्य नसतात. यामध्ये मुलं माती, दगड, बर्फ, खडू आदी गोष्टी खातात. काही वेळा ही समस्या प्रौढांमध्येही आढळते.
दुष्परिणाम –
- माती, खडूसारख्या गोष्टी खाल्ल्याने जंताचा त्रास होतो.
- जेवण कमी जाते आणि शरीरात पोषणाचा अभाव निर्माण होतो.
- शिसे असलेल्या गोष्टी खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते.
- असे पदार्थ खाल्ल्याने पोटात अडथळा, बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होऊ शकतो.
- खडे पोटात अडकून आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. यासाठी ऑपरेशनची वेळ येऊ शकते.
सवय कशी मोडाल?
- मुलांना या गोष्टी खायची सवय असेल तर बालरोगतज्ज्ञांची मदत घ्यावी. त्याच्याकडून लोहरपूरक औषधाविषयी जाणून त्यांच्या सल्ल्याने मुलांना द्यावे.
- मुलाच्या पोटात जंत झाले असतील तर त्यावर योग्य उपचार करावेत.
- पालकांनी मारून-ओरडून नाही तर गोडीगुलाबीने मुलांची ही सवय मोडायला हवी.
- पालकांनी मुलांवर लक्ष द्यावे. अशा गोष्टींपासून मुलांना दूर ठेवावे.
हेही वाचा – E-cigarette Side Effects : ई- सिगरेट म्हणजे काय, तरुण पिढी का अडकतेय या सवयीमध्ये?
Comments are closed.