Gopika Govind Story : मजूराच्या लेकीची गगनभरारी, बनली एअर होस्टेस

स्वप्न पूर्ण करायची असतील कठोर मेहनत आणि अथक चिकाटीला पर्याय नाही. अनेकदा मनगटात ताकद नसूनही केवळ इच्छाशक्तीच्या बळावर पाहिलेलं स्वप्न पूर्ण करता येतं. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे केरळची गोपिका गोविंद. गोपिकानं गगनभरारीचं केवळ स्वप्न पाहिलं नाही तर ते सत्यात उतरवलं आहे. गोपिका गोविंद ही केरळच्या आदिवासी समाजातील पहिली एअर होस्टेस तरुणी ठरली आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही स्वप्नांचा पाठलाग करत तिने गगनभरारी घेतली आहे.

गोपिका गोविंद ही केरळच्या अलाक्कोडे जवळील कावुनकुडीमधल्या ST कॉलनीतील रहिवासी असून करिंबला या आदिवासी समाजातील आहे. गोपिकाचे आई-वडील दोघेही रोजंदारीवर काम करणारे कामगार आहे. गोपिका लहान असल्यापासून फ्लाइट अटेंडंट व्हायचे होते. आर्थिक स्थिती बेताची असूनही त्यावर मात करत गोपिकाने रसायनशास्त्रात बी. एस्सी पूर्ण केली. पुढे येणाऱ्या संकटांनी ती थोडी डगमगली आणि घरची हालाकिची परिस्थिती पाहून तिने एअर होस्टेस होण्याच्या स्वप्नाशी तडजोड करण्याचा निर्णय घेतला. पण, पदवी प्राप्त झाल्यानंतर जवळपास वर्षभराने वृत्तपत्रात युनिफॉर्ममधील केबिन क्रू फोटो पाहिला आणि तिने पुन्हा एकदा आकाशात उंच भरारी घेण्याचं ठरवलं.

हेही वाचा – Smita Patil Birthday : स्मिता पाटील अभिनेत्री होण्यापूर्वी करायच्या हे काम

आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. तिने याची मदत घेत एव्हिएशन संदर्भातील कोर्स पूर्ण केला. वायनाडमधील कालपेट्टा इथल्या ड्रीम स्काय एव्हिएशन ट्रेनिंग अकादमीचा हा कोर्स होता. तिने कोर्स करत असतानाच अनेक मुलाखती देण्यास सुरुवात केली आणि पहिल्याच प्रयत्नात तिला यश आलं. जवळपास तीन महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये तिची केबिन क्रू म्हणून नियुक्ती करण्यात आली. कन्नूर ते गल्फ असा पहिलावहिला आकाश प्रवास तिने केला.

गोपिकाची जिद्द तर आहेच पण याशिवाय ती लहानपणापासून अत्यंत हूशार आहे. तिचा हा प्रवास अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. गोपिकाला अनेक अडचणी आल्या, मार्गदर्शन करणारे कोणीही नव्हते पण, तरीही ती थांबली नाही तिने प्रवास निरंतर सुरूच ठेवला. आज गोपीका केवळ आपल्या कुटुंबाचा नव्हे तर संपूर्ण आदिवासी समाजाचा अभिमान बनली आहे. तिच्या या अद्भूत प्रवासाने दाखवून दिलं की, निर्धार आणि प्रयत्न असतील तर कोणतीही पार्श्वभूमी नसताना उंच भरारी नक्कीच घेता येते.

हेही वाचा – हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ नृत्यांगना मधुमती

Comments are closed.