Microwave cancer risk: मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करणं म्हणजे कॅन्सरला आमंत्रण? वाचा रिसर्च काय सांगतं

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मायक्रोवेव्ह हे स्वयंपाकघरातील रोजच्या वापरातील उपकरण झाले आहे. दोन मिनिटांत अन्न गरम, थंड झालेली चहा परत मिळणार गरम, तयारी झटपट. त्यामुळे घर, ऑफिस, हॉटेल कुठेही मायक्रोवेव्हचा वापर सतत वाढतो आहे. याच वापराबाबत एक प्रश्न मात्र सर्वांना सतावत राहतो. मायक्रोवेव्हमध्ये गरम केलेले अन्न कर्करोगाला कारण ठरते का? अनेकांना सोशल मीडियावर फिरणाऱ्या माहितीमुळे भीती वाटते. पण वास्तव काय? (microwave food cancer risk truth and safety tips)

जागतिक संशोधन संस्थांच्या म्हणण्यानुसार, मायक्रोवेव्ह किरणे फक्त अन्नातील पाण्याला तापवतात. यामुळे अन्न किरणोत्सर्गी होत नाही किंवा थेट कॅन्सर तयार होत नाही. मात्र काही सर्वसामान्य चुका धोकादायक ठरू शकतात आणि हेच खरेपण जाणून घेणे आवश्यक आहे.

कशामुळे धोका वाढतो?

१) प्लास्टिकच्या डब्यात अन्न गरम करणे
काही प्लास्टिक गरम झाल्यावर हानिकारक रसायनं अन्नात मिसळतात. ही शरीरात गेली तर दीर्घकाळात कॅन्सरचा धोका वाढू शकतो. काचेचे किंवा सिरेमिकचे डबे अधिक सुरक्षित असतात.

२) धातूच्या वस्तू मायक्रोवेव्हमध्ये ठेवणे
अॅल्युमिनियम फॉईल किंवा स्टीलची भांडी ठेवल्यास स्पार्क होऊ शकतात आणि मोठे नुकसान होऊ शकते.

३) जास्त वेळ गरम करणे
अति तापवलेले अन्न चव खराब करण्याबरोबरच आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते.

४) झाकण पूर्णपणे बंद ठेवणे
वाफ बाहेर निघू न दिल्यास कंटेनर फुटण्याचा धोका असतो.

गर्भवती महिलांनी विशेष काळजी का घ्यावी?
चुकीच्या प्लास्टिक कंटेनरमध्ये गरम केलेले अन्न शरीरासाठी रसायनांचे ओझे वाढवते. गर्भाच्या आरोग्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे सुरक्षित कंटेनरचा वापर अनिवार्य आहे.

पौष्टिकतेची कमतरता आहे का?
बऱ्याच जणांना असं वाटतं की मायक्रोवेव्हमुळे पोषक तत्वे नष्ट होतात.
खरं म्हणजे, स्टोव्ह किंवा उकळण्याप्रमाणेच काही पोषक तत्व कमी होतात, पण योग्य वेळ आणि तापमानात गरम केले तर नुकसान कमी होते.

कसा कराल सुरक्षित वापर?
1) नेहमी Microwave Safe लिहिलेला डबा वापरा
2) अन्नाला आवश्यक तेवढाच वेळ गरम करा
3) झाकण थोडे उघडे ठेवा
4) कोरडे पदार्थ खूप वेळ गरम करू नका
5) मशीन स्वच्छ ठेवा

मायक्रोवेव्ह स्वतः कॅन्सरचे कारण नाही.पण चुकीचे कंटेनर, जास्त तापवणे आणि अज्ञानातून होणाऱ्या चुका आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. म्हणून सुरक्षित पद्धतीने मायक्रोवेव्हचा वापर केल्यास भीतीची गरज नाही.

(टीप : वरील माहिती विविध संशोधनांवर आधारित असून वाचकांच्या माहितीसाठी दिली आहे. वैयक्तिक सल्ल्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Comments are closed.