Women Health : पिरीएड्समध्ये पॅड वापरल्याने त्वचा काळवंडते? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

महिलांसाठी पिरीएड्स दरम्यान वापरले जाणारे सॅनिटरी पॅड हे रोजच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. पण अनेक तरुणी एक प्रश्न वारंवार विचारतात पॅड वापरल्यामुळे इंटिमेट एरियाची त्वचा काळी पडते का? हा बदल दिसला, की लगेच चिंता वाढते. चेहरा, हात किंवा गळा काळा पडला तर लगेच काळजी घेतली जाते, पण खाजगी भागाची स्वच्छता आणि काळजी अनेकदा दुर्लक्षित होते. यामुळेच त्या भागात त्वचेचा रंग गडद होऊ लागतो. (women health pads darkening skin periods true facts)

पण यामागे फक्त पॅडचे कारण नसते. काही सोप्या आणि रोजच्या गोष्टी या समस्येचं मूळ असतात.

त्वचा काळवंडण्याची प्रमुख कारणे

घर्षण वाढणे:
घट्ट अंडरवेअर, जास्त हालचाली आणि पॅडशी होणारा घर्षण त्वचेला हळूहळू काळे करतो.

घाम व सतत ओलावा:
ओलावा जास्त राहिला तर त्वचा चिडचिडी होते, खाज सुटते आणि रंगद्रव्य वाढू शकते.

वैयक्तिक स्वच्छता न राखणे:
पॅड बदलण्यामध्ये जास्त वेळ लावल्यास त्वचेवर परिणाम होऊ शकतो.

हार्मोनल बदल:
पिरीएड्स, गर्भधारणा किंवा वयाप्रमाणे हार्मोन्समध्ये बदल होतात आणि त्वचा गडद दिसू शकते.

अनुवंशिकता व नैसर्गिक त्वचा रंग:
काही महिलांमध्ये नैसर्गिकरीत्या या भागाचा रंग गडद असतो, आणि हे पूर्णपणे सामान्य आहे.

तर मग पॅडचं काय?
पॅड स्वतः त्वचा काळी करत नाही. चुकीच्या वापरामुळे समस्या वाढते जसं की जास्त वेळ एकच पॅड वापरणे. प्लास्टिकचे जास्त अस्तर असलेले पॅड वायुप्रवाह कमी होणारी आतील वस्त्रे किंवा घाम साचून राहणे यामुळे त्वचेवर दाह, चिडचिड किंवा पिगमेंटेशन होते म्हणजेच त्वचा काळी पडण्याची शक्यता जास्त असते.

काळेपणा कमी करण्यासाठी सोपे उपाय:

1) दर 4-6 तासांनी पॅड बदला.
2) सुटे आणि सूती अंडरवेअर वापरा.
3) इंटिमेट एरिया कोरडा ठेवण्याचा प्रयत्न करा.
4) मऊ आणि pH-balanced वॉश वापरा.
5) नैसर्गिक मॉइश्चरायझर कोरफड जेल किंवा नारळाचे तेल.
6) कठोर रसायन आणि कॉस्मेटिक उत्पादने टाळा.

जर खूपच त्रास होत असेल तर तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार उपचार घ्यावेत.

इंटिमेट एरियाचा रंग शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत थोडा गडद असणे अगदी नैसर्गिक आणि सामान्य आहे. हा कोणताही आजार नसून त्वचेची नैसर्गिक रचना आहे. आत्मविश्वास कमी करण्यासारखी ही गोष्ट नाही.

(अस्वीकरण: या लेखातील माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. कोणतीही अडचण किंवा त्रास जाणवल्यास स्वतः उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Comments are closed.