Interesting Facts: केळी असो किंवा अंडी एका डझनात फक्त 12 वस्तूच का असतात? 10, 11 का नाही
आपण दररोज बाजारात जातो आणि अनेक वस्तू घेतो. पण काही गोष्टी आपण नकळत स्वीकारल्या आहेत. उदाहरणार्थ केळी, अंडी किंवा मिठाई घेताना आपण थेट दुकानदाराला सांगतो, “एक डझन द्या”. आणि दुकानदार सरळ 12 वस्तू पुढे करतो. पण कधी आपल्या लक्षात आलंय का, की डझन म्हणजे नेहमीच 12च वस्तू का? 10 नाही, 11 नाही… अखेर 12साठीच हा मानदंड का? या प्रश्नामागे परंपरेपेक्षा अधिक खोलात दडलेलं गणित, इतिहास आणि व्यापाराची गरज समजून घेण्यासारखी आहे. (why dozen means 12 items interesting history facts)
‘डझन’ हा शब्द इंग्रजी ‘Dozen’ मधून आला आहे. पण हे इंग्रजी मूळही लॅटिन भाषेतील ‘Duodecim’ या शब्दाशी जोडलेले आहे. Duodecimचा अर्थच होतो ‘बारा’. म्हणजेच भाषेच्या मूळातच 12 ही संख्या ‘संपूर्ण’ गट मानली गेली असून, पुढे अनेक संस्कृतींमध्ये त्याचाच स्वीकार झाला. म्हणूनच शब्दाचं रूप बदललं, पण 12 या अंकाचं महत्त्व कायम राहिलं.
आज आपण 10 वर आधारित दशमान पद्धत वापरतो. पण खूप जुने काळ, जसं की इजिप्त, बाबिलोन, रोम या प्राचीन संस्कृतींच्या गणनेत 12 अंकाला विशेष स्थान होतं. वर्षात 12 महिने असणं, दिवस-रात्र 12-12 तासांमध्ये विभागणं, वर्तुळ 360 अंशांचं असणं आणि त्याचे 12 समान भाग सहज करता येणं यामुळे 12 ही संख्या पूर्णतेचं प्रतीक बनली. लोकांना व्यवहार करताना हिशोब सुटसुटीत हवा असल्याने 12 चा वापर झपाट्याने वाढला.
व्यापार क्षेत्रात तर 12चा फायदा अधिक मानला गेला. कारण 12 ही संख्या अर्ध्या, चौथ्या, सहाव्या भागांत नीट विभागता येते. त्यामुळे माल विकताना हिशोब चुकण्याची शक्यता कमी. उदाहरण देताच समजते 12 चं अर्धं म्हणजे 6, चौथाई म्हणजे 3 आणि सहावा भाग म्हणजे 2. ही विभागणी 10 किंवा 11 मध्ये इतकी सोपी होत नाही. म्हणूनच व्यापाऱ्यांनी 12 वस्तूंच्या गटाला एक मोजण्याचं आदर्श एकक मानलं आणि त्यालाच ‘डझन’ म्हटलं जाऊ लागलं.
इतिहासात एक काळ असा होता, जेव्हा इंग्लंडमधील बेकरीवाले एका डझनमध्ये एक वस्तू जादा देत. म्हणजे 12 ऐवजी 13. याला “Baker’s Dozen” म्हटलं जायचं. या मागेही कारण होतं ब्रेड किंवा बन वजनाने विकले जात. जर थोडं वजन कमी ठरलं, तर ग्राहकाला नुकसान होऊ नये म्हणून एक तुकडा अधिक दिला जाई. म्हणजेच व्यापाऱ्यांनी विश्वास राखण्यासाठी अशी पद्धत आणली.
आज काळ बदलला आहे. खरेदी-विक्रीच्या पद्धती बदलल्या आहेत. पण डझनची मोजणी मात्र अजूनही कायम आहे. विशेषतः अंडी, फळं, फुले, मिठाई अशा वस्तूंसाठी 12 हा गट ‘पूर्ण’ आणि ‘योग्य’ मानला जातो. म्हणूनच दुकानात गेल्यावर आपण नकळत म्हणतो एक डझन द्या. शतकानुशतक जुनी ही परंपरा आजही आधुनिक व्यवहारात आपली जागा टिकवून आहे.
Comments are closed.