रोमान्स नाही, अपेक्षा नाही लग्नाचा नवा ट्रेंड ‘फ्रेंडशिप मॅरेज’, का वाढतेय या ट्रेंडची क्रेझ?
लग्न म्हटलं की प्रेम, रोमान्स, भावनिक नातं आणि आयुष्यभराची सोबत… अशीच पारंपारिक प्रतिमा आपल्या मनात असते. पण आजची तरुण पिढी नात्यांकडे वेगळ्या नजरेने पाहू लागली आहे. जपानमध्ये एका नव्या संकल्पनेचा उदय झाला आहे फ्रेंडशिप मॅरेज. या लग्नात पती-पत्नींमध्ये प्रेम किंवा शारीरिक आकर्षण नसतं. नात्याचं मूळ असते ते फक्त मैत्री, परस्पर समजूतदारपणा आणि एकमेकांच्या सोबत जगण्याची इच्छा. (friendship marriage trend japan new relationship style)
जपानमध्ये 2015 नंतर या संकल्पनेला गती मिळाली. पारंपारिक विवाहातील दबाव, समाजाच्या अपेक्षा आणि नात्यातील भावनिक गुंतागुंत टाळण्यासाठी अनेक तरुणांनी हा पर्याय स्वीकारायला सुरुवात केली. आज जपानमध्ये शेकडो जोडपी अशा पद्धतीने लग्न करून एकत्र राहत आहेत. या नात्यात प्रेम नसतं, तरीही ते एकमेकांसोबत राहतात कारण त्यांच्या मते आयुष्यात सोबती महत्त्वाचा, रोमान्स नव्हे.
फ्रेंडशिप मॅरेज म्हणजे नेमकं काय?
फ्रेंडशिप मॅरेज म्हणजे दोन मित्रांनी एकत्र राहण्याचा, आयुष्य शेअर करण्याचा व्यावसायिक आणि सामाजिक करार. यामध्ये कपल्स लग्नाआधीच अनेक गोष्टी स्पष्ट करतात घरातील खर्च, वैयक्तिक स्पेस, भविष्याचे निर्णय, मुलांचा विचार असे अनेक नियम ठरवल्यावरच हे नातं सुरू होतं. प्रेमातील अपेक्षा, मत्सर, अधिकार किंवा बंधनं या नात्यात नसतात. दोघेही एकमेकांचा आदर राखून स्वतंत्रपणे जगतात आणि तरीही एकमेकांचे जवळचे साथीदार असतात.
अशा प्रकारचं लग्न कोण करतं?
फ्रेंडशिप मॅरेज प्रामुख्याने अशा लोकांसाठी सोयीचं ठरतं ज्यांना लैंगिक आकर्षण नसतं किंवा पारंपारिक विवाहात अडचणी येतात. काही LGBTQ लोकांसाठी हा पर्याय त्यांच्या जगण्याला सुरक्षितता आणि सामाजिक ओळख देतो. तसेच, करिअर-केंद्रित तरुणांचे मत आहे की, प्रेमातील काही अवास्तव अपेक्षा आणि तणाव टाळून, जीवन जास्त सोपं आणि शांत करता येतं. त्यामुळे फक्त समजून घेणारा, मैत्रीचा हात देणारा जोडीदार मिळणं त्यांच्यासाठी पुरेसं असतं.
का वाढतेय या ट्रेंडची लोकप्रियता?
जपानमध्ये लग्न आणि मुलं याबाबत समाजाचा दबाव खूप मोठा असतो. परंतु आजच्या तरुणांना नात्यात मोकळेपणा, मानसिक आधार आणि परस्पर आदर हवा आहे. फ्रेंडशिप मॅरेज त्यांना हे सर्व देते. भावनिक ताण कमी असल्यामुळे वाद आणि निराशा देखील कमी दिसते. या लग्नात दोघेही समसमान जबाबदारी घेतात आणि स्वतंत्रपणे करिअर, आर्थिक नियोजन करू शकतात. सरकारी करसवलती आणि इतर सुविधा मिळाल्यानेही अनेक तरुण या पर्यायाकडे वळत आहेत.
फ्रेंडशिप मॅरेज ही प्रेमाची जागा घेणारी गोष्ट नाही, पण आजच्या बदलत्या जगाचे वास्तव स्वीकारणारी व्याख्या आहे. प्रत्येकाला आयुष्यात एक विश्वासू साथीदार हवा असतो. प्रेम असो वा नसो, मन मोकळं करायला, निर्णय शेअर करायला, आणि आधार देण्यासाठी कुणीतरी आपलं हवंच असतं. या नात्यात दिखावा नाही, बंधनं नाहीत. आहे ती फक्त मैत्रीवर उभी राहिलेली सोबत आणि जीवन अधिक सोपं करण्याचा प्रयत्न. कदाचित भविष्यात हा ट्रेंड जगभर दिसू लागेल. कारण नात्यांचं रूप बदलत असलं तरी, सोबत जगण्याची इच्छा कधीही बदलत नाही…
Comments are closed.