Neerja Bhanot: ‘हिरोइन ऑफ हायजॅक’ नीरजा भानोत; 23 व्या वर्षी प्रवाशांना वाचवण्यासाठी गमावला जीव

नीरजा भानोत… भारताची ती शूरवीर कन्या जिला ‘हिरोइन ऑफ हायजॅक’ या नावाने ओळखले जाते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या हवाई कन्येने दहशतवाद्यांच्या तावडीतून प्रवाशांना वाचवले. 5 सप्टेंबर 1986 मध्ये कराचीत पॅन ॲम फ्लाइट 73 हे हायजॅक करण्यात आलं होतं. या हायजॅकमध्ये नीरजा अवघ्या 23 व्या वर्षी शहीद झाली. नीरजाचा जन्म 7 सप्टेंबर 1963 मध्ये झाला होता. आपल्या जन्मदिनाच्या 2 दिवस आधीच ती हे जग कायमचे सोडून गेली. ( Neerja Bhanot Life Story )

नीरजाचा जन्म चंदीगडमध्ये झाला होता. तिचे वडील हरीश भानोत हे पत्रकार होते. तिचे प्राथमिक शिक्षण हे चंदीगडमधील सेक्रेड हार्ट सेकंडरी स्कूलमध्ये झालं. नंतर तिचे कुटुंब मुंबईत स्थायिक झालं आणि मुंबईमधील बॉम्बे स्कॉटिश स्कूल व सेंट झेविअर्स महाविद्यालयातून तिने पदवी मिळवली. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी नीरजाचे लग्न झालं. पण मानसिक छळामुळे ती तिच्या घरी मुंबईत परतली.

नंतर तिने पॅन ॲम कंपनीत अर्ज दिला. निवड झाल्यानंतर ती काही काळ मायामी येथे प्रशिक्षणासाठी गेली व नंतर पॅन ॲममध्ये पर्सर म्हणून दाखल झाली. नीरजा पॅन ॲम 73 या विमानावर वरिष्ठ पर्सर म्हणून नोकरी करत होती. दुर्दैवाने याच विमानात तिचा अंत झाला. 5 सप्टेंबर 1986 रोजी मुंबईहून न्यूयॉर्कला जात असलेले पॅन एम फ्लाइट 73 या विमानाला पाकिस्तानच्या कराचीत हायजॅक करण्यात आले. विमान धावपट्टीवर होते तेव्हा हायजॅकची माहिती मिळताच विमानचालक, साहाय्यक विमानचालक व विमान इंजिनिअर विमानातून पळून गेले, त्यावेळी नीरजाने सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली.

जवळपास 17 तासांनंतर दहशतवाद्यांनी विमानात गोळीबार चालू केला. तेव्हा नीरजाने आपत्कालीन दरवाजा उघडून अनेक प्रवाशांना बाहेर पळण्यास मदत केली. तिने तीन लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी दहशतवाद्यांच्या गोळ्या स्वतःच्या अंगावर घेतल्या. तिने दाखवलेल्या शौर्यासाठी तिला भारत सरकारकडून मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. नीरजा ही अशोकचक्र सन्मान मिळवणारी देशातील सगळ्यात लहान व्यक्ती आहे.

मॉडेल म्हणूनही आजमावले नशीब (नीरजा भानोत मृत्यू)

हवाई सुंदरी बनण्याआधी नीरजाने मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावले. तिनं बेंजर साडी, बिनाका टूथपेस्ट, गोदरेज बेस्ट डिटरजेंट आणि विको टरमरिक क्रीम सारख्या उत्पादनाची जाहिरात केली होती. नीरजा ही राजेश खन्ना यांची खूप मोठी चाहती होती. नीरजाच्या या शौर्याचे जगभरात कौतुक झालं. केवळ भारतच नव्हे तर तिला पाकिस्तानातील तमगा-ए-इंसानियत पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं. 2016 मध्ये नीरजाच्या शौर्यगाथेवर ‘नीरजा’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेत्री सोनम कपूरने नीरजाची भूमिका साकारली होती.

Comments are closed.