कांद्याला काळे डाग आलेत तरी स्वयंपाकात वापरताय? सावधान! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

कांदा हा भारतीय स्वयंपाकघरातील अविभाज्य भाग आहे. चटणीपासून ते भाजीपर्यंत, कांद्याशिवाय जेवणाची चवच येत नाही. पण कधी तुम्ही लक्ष दिलंय का कांद्यावर काळे डाग दिसले तरी आपण तो सहज वापरतो? अनेक घरांमध्ये साठवलेले कांदे दमट हवेमुळे बुरशीयुक्त होतात आणि काळे ठिपके दिसतात. पण हे डाग केवळ बाह्य असतात की त्यामागे आरोग्याचा धोका दडलेला असतो? याबाबदल सविस्तर जाणून घेऊयात. (black spots on onion side effects health risk)

कांद्यावर काळे डाग का येतात?
जेव्हा कांदे दमट, उबदार आणि हवेशीर नसलेल्या ठिकाणी साठवले जातात, तेव्हा त्यांच्या सालींवर बुरशी तयार होते. ही काळी बुरशी Aspergillus niger नावाच्या सूक्ष्मजीवामुळे तयार होते. सुरुवातीला हे डाग वरच्या सालीपुरते मर्यादित असतात, पण ओलावा वाढल्यास ते आतपर्यंत जाऊ शकतात.

वाहतूक, साठवणूक किंवा हाताळणी दरम्यान कांद्याला इजा झाली तर त्या ठिकाणीही बुरशी वाढते. ही बुरशी ‘ऑक्रॅटॉक्सिन ए’ (Ochratoxin A) नावाचं विष तयार करू शकते, जे लिव्हर आणि किडनीसाठी हानिकारक ठरू शकतं.

काळे डाग असलेले कांदे खाणं योग्य आहे का?
जर बुरशी फक्त बाहेरच्या सालीवर असेल आणि आतील थर ताजे व पांढरे असतील, तर वरचा थर सोलून उरलेला कांदा वापरता येतो. पण कांदा मऊ, कुजलेला किंवा काळसर गंध देत असेल, तर तो तात्काळ टाकून द्या. स्वयंपाक करताना लक्षात ठेवा शिजवल्यानंतरही बुरशीमुळे तयार होणारे विषारी घटक नष्ट होत नाहीत. म्हणून दिसायला खराब कांदे वापरणं टाळा.

कांदे साठवताना घ्या ही काळजी
– कांदे नेहमी थंड, कोरड्या आणि हवेशीर जागी ठेवा.
– प्लास्टिक पिशवीत कांदे साठवू नका. त्यामुळे ओलावा वाढतो.
– दर काही दिवसांनी कांदे पाहून खराब झालेले वेगळे करा.
– पावसाळ्यात जास्त दिवस साठवणूक करू नका.
– जर घरात ओलावा असेल, तर कांदे कोरड्या कापडात किंवा जाळीदार टोपलीत ठेवा.

कोणत्या लोकांनी घ्यावी विशेष काळजी?
ज्यांना मधुमेह, लिव्हर किंवा फुफ्फुसाचे आजार आहेत, त्यांनी बुरशीयुक्त कांदे अजिबात खाऊ नयेत. कमजोर रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या लोकांमध्ये अशा बुरशीमुळे संक्रमण होण्याचा धोका वाढतो.

कांद्यावर काळे डाग हे केवळ दिसायला वाईट नसतात, तर ते आरोग्यासाठी धोकादायकही ठरू शकतात. त्यामुळे स्वयंपाक करताना थोडं निरीक्षण करा आणि सावधगिरी बाळगा. ताजे, स्वच्छ आणि कोरडे कांदेच वापरा.

Comments are closed.