Housewife’s Day 2025: राष्ट्रीय गृहिणी दिनाच्या निमित्ताने तिच्या कष्टांची जाणीव…

घर हे फक्त चार भिंतींनी आणि लॅव्हिश इंटेरिअरने नाही तर त्यात राहणाऱ्या माणसांच्या प्रेम, काळजी आणि त्यागाने ते ‘घरपण’ मिळवतं. त्या घराला खरं रूप देणारी, प्रत्येक गोष्ट सांभाळणारी, कधी आई, कधी पत्नी, कधी सून म्हणून प्रत्येक भूमिकेत समरस होणारी स्त्री म्हणजे गृहिणी. तिच्याविना घराची कल्पनाच अपुरी आहे. 3 नोव्हेंबर रोजी साजरा होणारा राष्ट्रीय गृहिणी दिन म्हणजे तिच्या निःस्वार्थ कष्टांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. नोकरी करणारी असो वा पूर्णवेळ घरात राहणारी दोन्ही स्त्रिया एकाच नात्याने घर आणि समाज दोन्ही सांभाळतात. मात्र, संसाराचा गाडा चालवताना अनेकदा त्या स्वतःच्या स्वप्नांचा आणि इच्छांचा त्याग करतात. (national housewife day importance of homemaker role)

कामावरून घरी परतल्यावर पुरुष थकलेला असतो, पण बाई? ती तर त्या क्षणी पुन्हा नव्या ऊर्जेने उभी राहते स्वयंपाक, मुलांची काळजी, घराची स्वच्छता आणि सगळ्यांची देखभाल. तिचं घड्याळ कधी थांबत नाही. कारण तिचं जगणंच इतरांसाठी असतं.

1199 मध्ये देशातील 23 टक्के स्त्रिया पूर्णवेळ घरात राहून संसार सांभाळत होत्या. 2014  मध्ये हे प्रमाण 29 टक्क्यांवर पोहोचलं. यातील अनेक स्त्रिया शिक्षित होत्या, त्यांच्याकडे कामाची क्षमता होती, पण त्यांनी आपल्या कुटुंबासाठी घर सांभाळणं निवडलं. काहींनी स्वतःच्या इच्छेने, तर काहींनी परिस्थितीमुळे. त्या ‘गृहिणी’ झाल्या पण सक्तीने किंवा प्रेमाने, त्यांचा दिवस मात्र सतत जबाबदाऱ्यांनी भरलेला असतो.

काळ बदलतोय. आज काही घरांमध्ये पुरुष घर सांभाळतात आणि स्त्रिया बाहेर काम करतात. पण अशा घरांची संख्या अजूनही कमी आहे. बहुतांश वेळा घरातली स्त्रीच प्रत्येक गोष्टीचं संतुलन राखते. घरातलं वातावरण सुखाचं ठेवणं, मुलांचं संगोपन, सगळ्यांच्या गरजा ओळखून त्यांची काळजी घेणं हे तिचं रोजचं वास्तव आहे. त्यामुळे आजच्या राष्ट्रीय गृहिणी दिनी, त्या प्रत्येक स्त्रीला सन्मान देण्याची वेळ आली आहे जी रोज आपलं संपूर्ण आयुष्य घराला समर्पित करते, पण तरी तिच्या कष्टांचं मोल पैशात मोजता येत नाही. तिचं अस्तित्व घराचा आधारस्तंभ आहे.

घर चालवणं हे केवळ काम नाही, तर ते एक कला आहे, जी प्रत्येक गृहिणी रोज जिवंत ठेवते. म्हणून या दिवशी फक्त शुभेच्छा नाही, तर आपल्या घरातल्या त्या स्त्रीला धन्यवाद देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण तिच्या न थांबणाऱ्या प्रयत्नांनीच प्रत्येक घर खरं घर बनतं.

Comments are closed.