Hair Care: हेअर ट्रान्सप्लांटची गरज नेमकी केव्हा भासते? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

आजच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या आणि असंतुलित आहाराच्या काळात केस गळणे, अकाली पांढरे होणे, कोंडा येणे या समस्या सर्व वयोगटांमध्ये वाढताना दिसतात. महागड्या हेअर ट्रीटमेंट्स बाजारात उपलब्ध असल्या, तरी योग्य उपचार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास या समस्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते. Only मानिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रसिद्ध डर्माटॉलॉजिस्ट डॉ. शंकर सावंत यांनी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केलं. (hair transplant tips in marathi)

डॉ. सावंत सांगतात, “हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे आपल्या शरीरातील एका भागातील निरोगी केसांची मुळे घेऊन टक्कल पडलेल्या भागावर लावणे. ही एक सुरक्षित आणि आधुनिक पद्धत आहे. यातून नैसर्गिक केसांची वाढ पुन्हा सुरू होते.” “आज २० ते २५ वयातसुद्धा केस गळतीचं प्रमाण वाढलं आहे. काहीजण २१ व्या वर्षी पूर्णपणे टक्कल पडलेले दिसतात. अनेक तरुण लग्नाच्या आधीच मानसिक ताणाखाली जातात, आत्मविश्वास हरवतात आणि काही वेळा डिप्रेशनमध्ये जातात. त्यामुळे हेअर ट्रान्सप्लांट ही केवळ सौंदर्यविषयक नाही, तर मानसिक आरोग्याशीही जोडलेली गरज बनली आहे,” असं ते सांगतात.

“आज अनेक ठिकाणी कॉस्मेटिक, अगदी डेंटल क्लिनिकसुद्धा हेअर ट्रान्सप्लांट करत असल्याचं दिसतं. पण या प्रक्रियेसाठी क्वालिफाईड डर्माटॉलॉजिस्ट किंवा प्लास्टिक सर्जन असणं आवश्यक आहे. योग्य डॉक्टरकडून केल्यास परिणाम उत्कृष्ट आणि दीर्घकाळ टिकणारे मिळतात,” असा सल्ला डॉ. सावंत देतात.

डॉ. सावंत पुढे म्हणतात,“केस गळतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात औषधोपचार प्रभावी ठरू शकतात. बायोटीनसारख्या घटकांनी युक्त मल्टीव्हिटॅमिन टॅब्लेट्स, टॉनिक किंवा सिरम केसांच्या मुळांना पोषण देतात. जसं झाडाला पाणी कमी मिळालं की पानं गळतात, तसंच शरीरात व्हिटॅमिन आणि प्रोटीन कमी झालं की केस गळतात.” त्यामुळे ताप, संसर्ग, परीक्षा किंवा भावनिक ताण यांसारख्या काळात शरीरातील पोषक घटक कमी पडतात आणि केस गळू लागतात. अशावेळी साधे मल्टीव्हिटॅमिन घेतल्यास फायदा होतो, असं ते स्पष्ट करतात.

“अनेकजण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहारातून प्रोटीन कमी करतात. त्यामुळे केस गळती वाढते. वजन कमी करताना पुरेसं प्रोटीन आणि मल्टीव्हिटॅमिन घेणं गरजेचं आहे, अन्यथा केसांचा पोषणतुटवडा होतो,” त्यामुळे “जर हेअर ट्रान्सप्लांट योग्य पद्धतीने, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलं, तर त्याचे परिणाम नैसर्गिक दिसतात आणि ते अनेक वर्ष टिकतात. फक्त योग्य डॉक्टर, योग्य क्लिनिक आणि शिस्तबद्ध काळजी या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत,” असं डॉ. सावंत सांगतात.

Comments are closed.