Bird Test Trend: रिलेशनशिपचा नवा ट्रेंड; बर्ड टेस्टची कपल्समध्ये क्रेझ, ते नेमकं आहे तरी काय?
आजकाल सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड व्हायरल होईल ते सांगता येत नाही. त्यातच आणखी एक रिलेशनशिप ट्रेंड समोर आला आहे. Bird Test असं या ट्रेंडचं नाव आहे. तुम्हाला हे नाव ऐकूनच आश्चर्य वाटेल की हा नेमका काय प्रकार आहे. तर तेच आपण जाणून घेऊया…( New relationship trend on social media Bird Test )
तुमचा जोडीदार तुमच्याबद्दल किंवा नात्याबद्दल किती गंभीर आहे हे तपासण्यासाठी बर्ड टेस्ट केलं जातं. ही टेस्ट घेण्यासाठी फार काही करावं लागत नाही तर तुमच्या जोडीदाराला तुम्ही, ”बघ, किती सुंदर पक्षी आहे”, असं एखाद्या पक्षाकडे बघून बोलायचं. तुमच्या या बोलण्यावर तुमचा जोडीदार कशाप्रकारे प्रतिक्रिया देतो ते महत्त्वाचं असतं. त्यांनी जर तुमच्या बोलण्याकडे लक्ष देऊन अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तुमचा जोडीसार नात्याबद्दल सिरीयस असल्याचा अर्थ काढला जातो. याउलट तर तुमच्या बोलण्याकडे तुमच्या पार्टनरने दुर्लक्ष केलं तर तुमचा पार्टनर तुमच्याबाबतीत सिरीयस नाही असं म्हणतात.
का वाढतेय बर्ड टेस्टची क्रेझ?
आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा कपल्स भावनिकदृष्ट्या एकमेकांपासून दूर होत असल्याचं पाहायला मिळतं. अशावेळी नात्यातील हे अंतर भरून काढण्यासाठी हे बर्ड टेस्ट काम करतं. कपल्स एकमेकांच्या बोलण्याकडे किती प्राधान्य देतात हे यावरून कळतं. तसेच आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर करणं हे नात्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळेच बर्ड टेस्टची क्रेझ वाढत चालली आहे.
कसा सुरू झाला ट्रेंड?
अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॉ. जॉन गॉटमन यांच्या बिड्स फॉर कनेक्शन या संकल्पनेवर हे बर्ड टेस्ट आधारित आहे. एका संशोधनात त्यांना असं दिसून आलं की जे कपल्स एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टींवर प्रतिक्रिया देतात, एकमेकांसमोर भावना व्यक्त करतात त्यांचं नातं अधिक घट्ट राहतं. तर जे जोडपं एकमेकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करतात त्यांच्या नात्यात हळूहळू अंतर वाढत जातं.
Comments are closed.