एकाकी ज्येष्ठांची ‘Live In’ला पसंती, लग्नं नको पण पार्टनर हवा?
आजच्या समाजात लग्न आणि नातेसंबंधांविषयीच्या संकल्पना झपाट्याने बदलत आहेत. हे बदल केवळ तरुणांमध्येच नव्हे, तर आता ज्येष्ठ नागरिकांमध्येही दिसू लागले आहेत. “Only मानिनी” ला दिलेल्या खास मुलाखतीत माधव दामले फाऊंडेशनचे संस्थापक माधव दामले यांनी या बदलत्या दृष्टिकोनाबद्दल आणि ज्येष्ठांच्या नव्या विचारविश्वाबद्दल स्पष्ट मांडणी केली. (elderly relationship new trend no marriage just partner live in relation)
माधव दामले सांगतात, “आज अनेक ज्येष्ठ नागरिक म्हणतात, लग्न नको पण पार्टनर हवा. हे ऐकायला थोडं वेगळं वाटतं, पण ही आजच्या काळाची वास्तवता आहे. एकटेपण हा मोठा मानसिक ताण देणारा घटक बनला आहे. त्यामुळे लग्नाच्या सामाजिक चौकटीत न अडकता, केवळ सोबत आणि संवाद हवे आहेत, असा विचार वाढतोय.”
ते पुढे सांगतात, “आमच्या फाऊंडेशनमध्ये येणारे बहुतांश ज्येष्ठ हे आर्थिकदृष्ट्या सक्षम, रिटायर्ड आणि स्वतंत्र विचाराचे असतात. पण महिलांच्या बाबतीत चित्र थोडं वेगळं आहे. साधारण ३० टक्के महिला स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, पण उर्वरित ७० टक्के महिला गृहिणी असल्याने त्यांना आर्थिक स्वातंत्र्य नाही. त्यामुळे त्या लिव्ह-इन सारख्या नात्यांमध्ये फार पुढे येत नाहीत. मात्र, कोरोना काळानंतर परिस्थिती बदलली मुलं परदेशात, आणि आई-वडील इथे एकटे. त्यामुळे अनेक मुलं स्वतःच पालकांसाठी साथीदार शोधायला तयार झाली आहेत.”
दामले सांगतात की, “पूर्वी संयुक्त कुटुंबामुळे जेष्ठांना आधार मिळायचा. पण आज शहरीकरणामुळे प्रत्येक जण स्वतंत्र झाल्याने एकटेपण वाढला आहे. वयाच्या साठी नंतर पुढची २० वर्षं एकटं राहणं अवघड असतं. अशावेळी एखादं समविचारी व्यक्तिमत्व साथ देतं, तेव्हा आयुष्य अधिक सुंदर होतं.”
ते थोड्या विनोदी पण वास्तव स्वरात म्हणाले, “पुरुषांची अपेक्षा असते सुंदर, सडपातळ आणि प्रेझेंटेबल साथीदार हवी, पण आजारपण, जबाबदाऱ्या किंवा खर्च याबाबत तयार नसतात. उलट, महिलांची अपेक्षा असते की आता आयुष्यभर रांधून झालं, थोडं सुख उपभोगायचं. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, समजूतदार आणि भावनिक आधार देणारा माणूस हवा असतो.”
दामले यांच्या मतानुसार, “ही नाती प्रेमाच्या नव्या व्याख्या निर्माण करत आहेत. लग्नाची जबाबदारी, समाजाचा दबाव किंवा नात्याची बंधनं नकोत, पण माणूसपणाच्या नात्यातून मिळणारी सोबत हवी हेच आजच्या ज्येष्ठांचं वास्तव आहे.”
Comments are closed.