Eye Care: सौंदर्यप्रसाधने आणि मेकअप डोळ्यांसाठी हानिकारक?

डोळ्यांचं सौंदर्य वाढवण्यासाठी महिला विविध प्रकारचं मेकअप करतात. आयलाइनर, मस्कारा, आयशॅडो आणि काजळ ही उत्पादने आता फॅशनचा एक भाग बनली आहेत. मात्र, या सौंदर्यप्रसाधनांचा योग्य वापर न केल्यास ते डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकतात. ‘ओन्ली मानीनि’ला दिलेल्या खास मुलाखतीत नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी याबाबत महत्वाचं मार्गदर्शन दिलं. (eye care makeup safety tips dr tatyarao lahane)

डॉ. लहाने सांगतात, “काजळ किंवा कॉस्मेटिक वापरणं चुकीचं नाही, पण ते लावताना काही गोष्टींची काळजी घेणं अत्यावश्यक आहे. विशेषतः काजळ डोळ्याच्या आतल्या भागात, म्हणजे जिथे पाणी दिसतं त्या वॉटर लाईनवर लावणं टाळावं. तिथे कॉस्मेटिक लावल्यास डोळ्यांमध्ये संसर्ग होऊ शकतो किंवा लालसरपणा येऊ शकतो.”

ते पुढे सांगतात, “कधीही दुसऱ्याचं काजळ किंवा मेकअप प्रॉडक्ट वापरू नका. एकाच वस्तूने अनेक जण मेकअप करत असतील, तर त्यातून संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो. प्रत्येकाने स्वतःचं कॉस्मेटिक वापरावं आणि ते स्वच्छ ठेवावं.”

डॉ. लहाने यांच्या मते, कॉस्मेटिकचा वापर करताना तो तीन महिन्यांनी बदलणे आवश्यक आहे. “एकाच काजळ पेन्सिल किंवा आयलाइनरचा खूप काळ वापर केल्यास त्यावर जंतू वाढतात. त्यामुळे प्रत्येक तीन महिन्यांनी ते बदलावं आणि नवीन घ्यावं. तसेच मेकअप दिवसाअखेरीस नीट धुऊन काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे. रात्री झोपताना मेकअप डोळ्यांवर राहिला, तर तो आत जाऊन नुकसान करू शकतो,” असे ते स्पष्ट करतात.

डॉ. लहाने सांगतात, “अनेक वेळा कॉस्मेटिक वापरल्याने डोळ्यांना अ‍ॅलर्जी, लालसरपणा किंवा सूज येते. काही महिलांच्या पापण्यांवर लहान पुरळसदृश फोड येतात, ज्याला ‘स्टाय’ म्हणतात. हे सगळं हात न धुता मेकअप लावल्यामुळे किंवा अस्वच्छ कॉस्मेटिक वापरल्यामुळे होतं.”

ते शेवटी म्हणतात, “कॉस्मेटिक वापरणं चुकीचं नाही, पण सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. नेहमी स्वच्छ हातांनीच मेकअप लावा, डोळ्याच्या बाहेरूनच लावा आणि दिवसाच्या शेवटी तो स्वच्छ पुसून काढा. अशा प्रकारे काळजी घेतल्यास तुम्ही सौंदर्य आणि आरोग्य यांचा समतोल साधू शकता.”

Comments are closed.