Winter Diet: हिवाळ्यातील आहार कसा असावा? वाचा आरोग्यतज्ञांचा सल्ला

हिवाळा हा आरोग्यासाठी पूरक ऋतू मानला जातो. कारण या ऋतूत शरीराची पचनशक्ती चांगली असते, त्यामुळे या दिवसांत आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. शिवाय हवामान बदलामुळे संसर्गाच्या आजारांचा धोका वाढतो, त्यामुळे थंडीच्या या वातावरणात आहारात उबदार पदार्थांचा समावेश करणे गरजेचं असतं. या दिवसांत अनेक हंगामी भाज्या, फळं येतात, या भाज्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. चला तर मग जाणून घेऊया हिवाळ्यातील आहार नेमका कसा असावा? ( Winter Healthy Foods And Diet )

या दिवसांत गरम पदार्थ का खावेत तर त्याचं कारण म्हणजे पावसाळ्यात मंदावलेली पचनशक्ती हिवाळ्यात सुधारते. तसेच थंडीचा सामना करताना शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते. त्यामुळेच या दिवसांत उबदार, गरम पदार्थ खावे. तसेच आहारात रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर ठरणाऱ्या पदार्थांचाही समावेश करावा. यामुळे संसर्गाच्या आजारांपासून शरीराचं संरक्षण होतं.

सूप, गरम पाणी
पाणी हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतं. हिवाळ्यात थंड हवेमुळं पाणी पिण्याकडं दुर्लक्ष केलं जातं. मात्र त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. त्यामुळेच या दिवसांत पुरेसे पाणी प्यावं, पण थंड पाण्याऐवजी गरम किंवा कोमट पाणी पिणे चांगलं ठरतं. तसेच संध्याकाळच्या वेळी सूप, ग्रीन टी असे शरीराला गरमपणा देणारे पदार्थ घ्यावे. टोमॅटो, व्हेजिटेबल, कडधान्याचे पौष्टिक सूप आहारात घेणं फायदेशीर ठरतं.

हंगामी भाज्या
हिवाळा हा ताज्या भाज्यांचा आणि पोषक आहाराचा ऋतू आहे. या दिवसांत येणाऱ्या काही हंगामी भाज्या शरीराला उब देतात आणि संसर्गापासून संरक्षण करतात. जसे की, गाजर ही भाजी जीवनसत्त्व ‘ए’चा उत्कृष्ट स्त्रोत आहे. गाजरात फायबर, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्सही असतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. मटारमध्ये प्रोटीन, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात. मटार शरीराला ऊर्जा देते आणि हाडे मजबूत ठेवते. मेथी ही हिवाळ्यातील आरोग्यवर्धक पालेभाजी आहे. मेथी रक्तशुद्ध करते, पचन सुधारते आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. याशिवाय हरभरा, हुरडा हे पदार्थ देखील आहारात घ्यावे.

हंगामी फळे
हिवाळ्यातील हंगामी फळांचा आहारात समावेश करावा. जसे की, संत्री, मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती सुधारते. पेरूमध्ये फोलेट, फायबर्स, विटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे हिवाळयात होणारी पोटासंबंधी समस्या दूर करण्यास मदत होते. तसेच या दिवसांत आवळा मुबलक भरपूर प्रमाणात मिळतो. यात सी जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. पचन चांगले होण्यास आणि केस आणि डोळ्याचे आरोग्य चांगले राहते, त्यामुळं आहारत आवळ्याचं लोणचे, कँडी, चुंदा, आवळारस यांसारख्या पदार्थांचा समावेश करावा.

दुधाचे पदार्थ
या दिवसांमध्‍ये त्वचा कोरडी पडते. त्यामुळे आहारात योग्य प्रमाणात दूध, तूप, लोणी यांसारख्या पदार्थांचा समावेश असावा. तुम्ही तुपासोबतच खोबरे, शेंगदाणे, बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या, सूर्यफुलाच्या बिया घालून लाडू बनवू शकता. या दिवसांत गूळही शरीरासाठी चांगला ठरतो, त्यामुळे गूळ घालून डिंकाचे लाडू हिवाळ्यात अवश्य खावेत. तसेच रात्री हळदीचं दूधही घेण्याचा प्रयत्न करावा.

बाजरीची भाकरी
हिवाळ्यात बाजरीची भाकरी ही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. बाजरी हे अनेक पोषक तत्त्वांनी समृद्ध धान्य असते. हिवाळ्यात शरीराला ऊर्जा आणि उबदारपणाची जास्त गरज असते. यामुळे थंडीच्या दिवसांत बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. याशिवाय बाजरीच्या भाकरीमुळे पचनक्रिया सुधारते. वजन नियंत्रित करण्यास मदत होते आणि हृदयाचे आरोग्यही सुधारते. बाजरीत चांगल्या प्रमाणात अँटिऑक्सिडंटस् असतात. जे शरीराला हानिकारक फ्री रॅडिकल्सपासून वाचवते. हिवाळ्यात संक्रमण आणि रोगांशी लढण्यासाठी बाजरी चांगला स्रोत आहे.

Comments are closed.