Winter Bath Tips: हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळकरून बाहेर येताच थंडी का वाजते? जाणून घ्या कारणं

हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करणं म्हणजे एकदम रिलॅक्स मिळणं. थंडीचा त्रास विसरायला लावणारी ही गरम आंघोळ शरीराला उब देते, पण अंघोळ झाल्यावर बाथरूमबाहेर पडताच अचानक जास्त थंडी जाणवते. अनेकांना हा प्रश्न पडतो की असं का होतं? यामागे आपल्या शरीराच्या तापमान नियंत्रणाशी संबंधित काही सोपी आणि महत्त्वाची कारणं आहेत. (why you feel cold after hot shower in winter)

गरम पाण्यामुळे शरीराचं तापमान वर जातं
गरम पाण्याने अंघोळ केली की त्वचेखालील रक्तवाहिन्या थोड्या रुंद होतात. त्यामुळे रक्ताचा प्रवाह बाहेरच्या थराकडे वाढतो आणि शरीरातील उष्णता त्वचेपर्यंत पोहोचते. त्यामुळे आंघोळ करताना आपल्याला उकाडा जाणवतो. पण एकदम थंड हवेत गेल्यावर ही उष्णता जलद गतीने बाहेर पडते. शरीराला अचानक तापमानातील हा फरक सहन होत नाही आणि लगेच थंडी जाणवते.

आंघोळीनंतर पाणी उडून जाताना शरीरातील उष्णता कमी होते
अंघोळीनंतर त्वचेवर थोडंसं पाणी राहिलेलं असतं. हे पाणी वाफेत बदलताना शरीरातील उष्णता शोषून घेतं. त्यामुळे त्वचेचं तापमान आणखी खाली जातं. म्हणूनच आंघोळ करून टॉवेलने शरीर नीट पुसलं नाही तर आणखी जास्त थंडी जाणवते.

बाथरूमची गरम वाफ आणि बाहेरची थंड हवा
गरम पाण्यामुळे बाथरूममधील तापमान जास्त असतं. पण बाहेर पडल्यावर हवेत एकदम गारवा असतो. या अचानक बदलामुळे शरीराला टेम्परेचर शॉक बसतो. म्हणून बाथरूममधून बाहेर पडताच थंडी जास्तीने जाणवते.

गरम पाणी त्वचा कोरडी करतं
गरम पाण्याने आंघोळ केल्यावर त्वचेवरचं नैसर्गिक तेल कमी होतं. त्यामुळे त्वचा कोरडी पडते. आणि कोरड्या त्वचेवर थंड हवा जास्त परिणाम करते. त्यामुळे थंडी अधिक जाणवते.

हिवाळ्यात आंघोळीमुळे थंडी कमी जाणवण्यासाठी काही सोपे उपाय
– खूप जास्त गरम पाणी टाळावं.
– आंघोळीनंतर शरीर लगेच पुसून घ्यावं.
– बाहेर पडण्याआधी शॉल किंवा गरम कपडे तयार ठेवावेत.
– मॉइश्चरायझर वापरल्याने त्वचेचं तापमान टिकून राहतं.

Comments are closed.