Green Peas: मटार वर्षभर ताजे ठेवण्यासाठी काय करावं? जाणून घ्या स्टोअर करण्याची सोपी ट्रिक
थंडीत सर्वत्र दिसणारे मटार हे इतर ऋतूमध्ये मात्र मिळत नाही. मटार हे अनेक पदार्थांची चव वाढवतात. त्यामुळे थंडीत मिळणारे मटार वर्षभर स्टोअर केले जातात. बाजारात हे मटार कधीही सहज उपलब्ध होतात. पण जर तुम्हाला घरगुती पद्धतीने मटार वर्षभरासाठी स्टोअर करायचे असतील तर त्यासाठी सोपी ट्रिक तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. यामुळे मटार ताजे आणि हिरवेगार राहतात आणि तुम्ही ते सहज वापरू शकता. ( How to store green peas for long time? )
मटार फ्रीजमध्ये ठेवायचे की फ्रीजरला?
मटार साठवण्यासाठी सर्वात पहिला प्रश्न पडतो तो असा की मटार हे फ्रीज किंवा फ्रिजर कुठे साठवणं योग्य ठरतं. तर जर तुम्हाला मटार ३ ते ४ दिवस साठवायचे असतील तर तुम्ही ते फ्रिजमध्ये ठेवू शकता.यासाठी मटार सोलून एका हवाबंद डब्बा किंवा बॅगमध्ये ठेवा. त्यात ओलावा येऊ नये यासाठी बॅगेत किंवा डब्यात एक पेपर टॉवेल ठेऊ शकता. पेपर टॉवेल अतिरिक्त ओलावा शोषून घेतो आणि मटार खराब होत नाहीत.
याउलट जर तुम्हाला मटार हे दीर्घकाळ आणि जास्त प्रमाणात साठवायचे असतील तर फ्रीजर मटार ठेवणं सर्वात योग्य पर्याय आहे. यासाठी तुम्हाला एक सोपी ब्लांचिंग प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवा आणि त्यात सोललेले मटार घाला. मटारला फक्त 2-3 मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवा. त्यानंतर लगेच मटार उकळत्या पाण्यातून काढून बर्फाच्या पाण्यात टाका. यामुळे मटारची शिजण्याची प्रक्रिया थांबते आणि हिरवागार रंग तसाच राहतो.
थंड झाल्यावर मटार पाण्यातून काढून घ्या आणि पूर्णपणे कोरडं करून एअरटाइट फ्रीजर बॅगमध्ये (Air tight freezer bag) किंवा डब्यात पॅक करा. या पद्धतीने साठवलेली मटार ६-८ महिन्यांपर्यंत ताजे राहते आणि रंगही टिकून राहतो. ब्लांचिंग केल्याने मटारचा नैसर्गिक रंग, त्याचा गोडसर स्वाद आणि त्यातील पोषक तत्वे दीर्घकाळ सुरक्षित राहतात. ब्लांच न करता मटार थेट फ्रीजमध्ये ठेवल्यास लवकर खराब होण्याची शक्यता असते. एका वेळी लागेल तितकेच मटार फ्रीजमधून बाहेर काढा. या सोप्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही मटार अनेक दिवसांपर्यंत वापरू शकता.
Comments are closed.