मित्र,नातेवाईकांची प्रगती बघून त्रास होतोय?

काम, क्रोध, लोभ, प्रेम, मत्सर, या मानवी भावना आहेत. यातील प्रेम ही भावना सकारात्मकता दर्शवते. तर मत्सर,क्रोध, लोभ या नकारात्नक भावना दर्शवतात. प्रत्येक व्यक्ती स्वभावानुसार,प्रसंगानुसार या भावना व्यक्त करत असतो. पण जर तुम्हांला समोरच्याची प्रगती बघितल्यावर त्याच्याबद्दल अभिमान, आनंद न वाटता त्याच्याबद्दल मनात मत्सर, हेवा निर्माण होत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण जर वेळीच या भावनांवर तुम्हाला नियंत्रण मिळवता आले नाही तर मात्र या भावनेचे रुपांतर मानसिक विकारात होऊ शकते.

आपल्यापेक्षाही कोणी बेस्ट असू शकतं , हुशार-स्मार्ट, श्रीमंत असू शकतं, सुंदर असू शकत हे मान्य करणेही आपल्याला यायला हवं. समोरच्याच्या हातातला महागडा मोबाईल किंवा वस्तू किंवा त्याचे व्यक्तीमत्व, राहणीमान, कपडे, त्याचे घर बघूनही काहीजण अस्वस्थ होतात. स्वभावशास्त्रानुसार अशा भावना मनात येण मानवी स्वभावाला अनुसरून जरी असलं तरी ते सामान्य मात्र नक्की नाही. कारण अशा भावना तुमच्यात त्या व्यक्तीबद्दल नकळत नकारात्नक भावना तयार करतात. त्याच्याकडे जे आहे ते तुमच्याकडे नाही यामुळे मनाची चरफड होते. याच रागातून त्या व्यक्तीबद्दल मनात मत्सर निर्माण होतो. साधारणतं पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अशी मत्सराची भावना अधिक असते. पण त्यामुळे फायदा तर होतच नाही उलट त्या व्यक्तीबरोबरचे तुमचे संबंध बिघडतात. तो काय संघर्ष करून त्या स्थानापर्यंत पोहचला आहे ? किंवा त्याला-तिला मिळालेलं सौंदर्य नैसर्गिक आहे किंवा त्याच्याकडे-तिच्याकडे असलेली संपत्ती त्याने स्वकष्टाने, वडीलोपार्जित की दुसऱ्या मार्गाने मिळवलेली आहे हे माहीत नसतानाही आपण त्याचा राग करणे चुकीचे आहे.

विशेष म्हणजे घरातील मोठ्या व्यक्ती जर अशा स्वभावाच्या असतील तर साहजिकच घरातील मुलांवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे हा स्वभाव संपूर्ण कुटुंबात टप्याटप्याने उतरतो. यामुळे कोणाच्याही बाहय रुपाचा किंवा त्यांच्या श्रीमंतीचा, स्टेटसचा हेवा न करता आपल्याकडे काय आहे ते पाहावे. असा सल्ला तज्त्रमंडळींनी दिला आहे.जर अशा भावना सतत पाठलाग करत असतील तर तात्काळ तज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Comments are closed.